शहरातील वाहतुकीची समस्या जटिल बनविण्यास कारक ठरलेली अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेला अल्पविराम देत महापालिकेने ही अनधिकृत बांधकामे काढून घेण्यास काहीशी मुदत देऊन पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवर लाल निशाणाची मोहोर उमटविण्यास सुरुवात केली आहे. नगररचना विभागाच्या मदतीने सहा विभागात प्रमुख रस्त्यांवरील बांधकामांचे अवलोकन सुरू झाले आहे. या प्रक्रियेत प्रारंभी केवळ रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे धुंडाळली जात आहेत. त्याच इमारतीत मागील बाजूस कोणी अनधिकृत बांधकाम केले असल्यास रस्ता वाहतुकीशी त्याचा थेट संबंध येत नसल्याने ती आपसूक वगळली जाणार आहेत. रस्त्यालगतची अतिक्रमणे १९ जानेवारीनंतर कोणत्याही क्षणी हटविली जातील, असा इशारा पालिकेने दिला आहे.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, अर्निबधपणे फोफावलेल्या अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणांचा विषय ऐरणीवर आला. प्रमुख मार्गावरील बहुतांश व्यापारी संकुलात वाहनतळासाठी पुरेशी जागा नाही. या जागेत अनधिकृतपणे बांधकाम करून दुकाने, हॉटेल्स थाटली गेली आहेत. वाहनतळासाठी जागा नसल्याने उपरोक्त ठिकाणी जाणारे वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. सिंहस्थात लाखो भाविकांचा संचार होणार असताना ही स्थिती बिकट होण्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा श्रीगणेशा केला. त्यांच्या निर्देशानुसार पालिकेची यंत्रणा कार्यप्रवण झाली. गंगापूर रस्त्यासह पंचवटी व इतर काही भागात अनधिकृत बांधकामांवर हातोडा घालण्याचे काम सुरू झाले. मोहीम राबविताना पालिकेचा मुख्य रोख हा रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर राहिल्याचे पाहावयास मिळाले. धडक मोहिमेचा धसका घेऊन अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. या घडामोडी सुरू असताना पालिकेने तूर्तास अतिक्रमणधारकांना आपापले अतिक्रमण काढून घेण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत अवधी दिला आहे. अतिक्रमण तोडताना नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून अतिक्रमण काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात नगररचना विभागाने प्रमुख मार्गावरील व्यापारी संकुले, इमारती, हॉटेल, संस्थांची कार्यालये आदींचे नकाशे घेऊन पाहणीचे काम सुरू केले आहे. शहरात विकास नियंत्रण नियमावलीची अंमलबजावणी केली जाते.
रस्त्याच्या रुंदीनुसार बांधकाम करताना काही विशिष्ट अंतर सोडणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक बांधकामात पुढील जागा सोडली आहे की नाही, ती नियमानुसार आहे का, याची छाननी करून उपरोक्त जागेत काही अतिक्रमणे असल्यास त्यावर लाल रंगाच्या खुणा केल्या जात आहेत. सहा विभागात नगररचना विभागाच्या मदतीने हे काम सुरू असल्याचे या विभागाचे प्रमुख विजय शेंडे यांनी सांगितले.
या मोहिमेचा गमतीशीर भाग म्हणजे अतिक्रमणे अधोरेखित करताना केवळ इमारत, व्यापारी संकुले व तत्सम बांधकामांचा दर्शनी म्हणजे रस्त्याकडील भाग विचारात घेतला जातो. रस्त्याकडील बाजूने असलेल्या अतिक्रमणांवर लाल खुणा मारताना त्याच इमारत वा संकुलाच्या मागील बाजूस त्या स्वरूपाचे काही अनधिकृत बांधकाम असेल त्याकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला जात आहे. या संदर्भात शेंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या बाजूकडील अतिक्रमणांकडे खुणा केल्या जात असल्याचे सांगितले. पुढील टप्प्यात उपरोक्त इमारतींच्या मागील बाजूकडील अतिक्रमणांचे सर्वेक्षण केले जाईल असे त्यांनी सांगितले. १९ जानेवारीपर्यंत अनधिकृत बांधकाम काढण्यास अवधी देण्यात आला आहे. रस्ते वाहतुकीसाठी खुले राहावेत यासाठी प्रथमदर्शनी भागातील अतिक्रमणे हटविली जातील असे शेंडे यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामाच्या लाल शेऱ्यापासून तूर्तास मागील बाजूकडील अनधिकृत बांधकामांची सुटका झाली आहे.