बेकायदा सिलेंडर साठय़ांमधील आठ सिलेंडरच्या स्फोटातील दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी साठा केलेल्या खोलींच्या घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही या प्रकरणी अटक केली नसल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली. धाकटा खांदा गावातील मंगळवारच्या घटनेने पुन्हा एकदा गॅस सिंलेडरच्या बेकायदा सिलेंडर व्यवसायाचे पितळ उघड पडले आहे.
खांदा गावातील पांडुरंग हाशा म्हात्रे यांच्या मालकीच्या खोलीत सहा सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर  पोलिसांची झोप उडाली. स्फोटामुळे भंगारच्या नावावर चोरीने सिलेंडर व रॉकेलचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.    सिडको वसाहतीमधील फ्लॅट भाडय़ाने देताना पोलीस ना हरकतीसाठी नोंदणीचा नियम स्फोट झालेल्या खोलीमालकाला लावण्यात आला नव्हता. कामोठे पोलिसांनी पांडुरंग म्हात्रे व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  स्फोट झालेल्या घरात भारत गॅस सिलेंडर  व रॉकेलसाठा आला कोठून हा प्रश्न आहे.  जेएनपीटी येथून सिलेंडर भरून आलेल्या ट्रकमधून सिलेंडर या ठिकाणी चोरून हा साठा केला जात असल्याचे मंगळवारी स्फोट झाल्यावर ग्रामस्थ सांगत होते. काही सिलेंडरमधून गॅस अन्य मोकळ्या सिलेंडरमध्ये भरून पनवेलमधील हॉटेलमालकांना पुरविले जातात असाही आरोप या ग्रामस्थांनी केला. स्फोट झालेल्या खोलीत सुमारे ५० सिलेंडर व रॉकेलचा साठा केला जातो आणि त्याबद्दल पोलिसांना काहीच माहीत नाही हा दावा खोटा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.  सिलेंडरची साठवणूक केलेल्या खोलीमागे केरोसिनचे सरकारमान्य दुकान असल्याचे पनवेलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शशिकांत वाघमारे यांनी सांगितले. तसेच सिलेंडर साठा करण्यासाठी या व्यक्तींकडे हे सिलेंडर आले कसे यासाठी वाघमारे यांनी भारत पेट्रोलियम कंपनीकडे पत्रव्यवहार केला आहे.

आमचा काहीही संबंध नाही
धाकटा खांदा गावात असलेल्या बेकायदा सिलेंडर साठय़ाच्या व्यवसायाशी पोलिसांचा काही संबंध नाही. पोलिसांना या अवैध व्यवसायाची माहिती असती तर हा व्यवसाय बंद केला असता. स्फोट झालेल्या खोलीत भारत पेट्रोलियमचे २० गॅस सिलेंडर व शेजारी रॉकेलचे दुकान असल्याचे स्फोटानंतर चौकशी केल्यावर समजले. जखमींवर उपचार सुरू आहेत. बेकायदा सिलेंडरचा साठा ठेवल्याप्रकरणी दोषींविरोधात पोलीस कारवाई करणार आहेत.   
-श्रीराम मुल्लेमवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे पोलीस ठाणे.