छापा घालण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर अवैध दारू विक्रेत्यांनी दगड-विटांचा मारा करीत काठय़ा, शस्त्रे घेऊन हल्ला केला. या घटनेत चार पोलीस जखमी झाले. जलालखेडाजवळील उमठा येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
उमठामध्ये अवैध दारू विकली जात असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार पितांबर जाधव यांच्यासह जलालखेडा पोलिसांनी तेथे छापा मारला. चार घरातून दोन क्विंटल गुळ, पाचशे लिटर मोहफुलाचा सडवा, पन्नास लिटर मोहाची तयार दारू, एक बाटली बिअर, असा एकूण तीस हजार शंभर रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचा पंचनामा सुरू असताना अवैध दारू विकणाऱ्यांनी अचानक पोलिसांवर हल्ला केला. त्यात महिला व मुलांचाही समावेश होता.
आधी जमावाने विटा व दगडांचा मारा केला. त्यानंतर हातात काठय़ा व धारदार शस्त्रे घेऊन जमाव चालून आला. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलीस गांगरून गेले.
जमावातील कुणीतरी हवालदार दिलीप इंगळे यांच्यावर धारदार शस्त्राचा वार केला. दगड-विटांच्या माराने निलेश खेरडे व अस्मिता गायकवाड, योगेश कळंबे हे शिपाई जखमी झाले.
महिला आरोपींच्या गराडय़ात असलेल्या अस्मिताने धैर्याने हल्ला परतवून लावला. तिचा रौद्रावतार पाहताच हल्लेखोर जमाव पळून गेला. जखमी अवस्थेतही अस्मिताने दोन महिलांना घट्ट धरून ठेवले. हल्ला झाल्याचे समजताच काटोल पोलीस तेथे धावून गेले. हल्ला करणाऱ्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रेशमा भाऊ पवार व बसंती भाऊ पवार या दोघींना अटक करण्यात आली. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.