मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांनी पोलीस बंदोबस्तात दारुखान्यातील झोपडपट्टय़ा हटवून मोकळ्या केलेल्या भूखंडावर पुन्हा झोपडपट्टीदादांनी कब्जा केला. मात्र आता वडाळा आणि शिवडी पोलिसांनी हद्दीचा वाद निर्माण करीत संरक्षण देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यातून हे भूखंड सोडविणे मुंबई पोर्ट ट्रस्टला अवघड बनू लागले आहे.
दक्षिण मुंबईमधील दारुखाना परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर भंगाराची गोदामे असून अनेक समाजकंटकांनी येथे आश्रय घेतला आहे. भूखंड क्रमांक आरआर-१४६५ वर सुमारे २५० हून अधिक झोपडय़ा उभारण्यात आल्या होत्या. मुंबई पोर्ट ट्रस्टचा संपदा विभाग व मुख्य अभियंता (सीई) यांच्या सहकार्याने आणि पोलिसांच्या मदतीने सुरक्षा रक्षक दलाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २४ जून रोजी या झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. मोकळ्या भूखंडाच्या रखवालीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र या झोपडपट्टीवर राज्य गाजविणारी रोशन जयस्वाल, अन्सारी या मंडळींनी सुरक्षा रक्षकांना धमकावून या भूखंडावर पुन्हा कब्जा मिळविला. कारवाईच्या दणक्यानंतर पसार झालेल्या रहिवाशांपैकी काहींना या मंडळींनी गोळा केले आणि पुन्हा झोपडय़ा बांधून त्यांची ५० ते ७५ हजार रुपयांना विक्री सुरू केली. या संदर्भात सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठांना माहितीही दिली. परंतु जीवाचा धोका ओळखून वरिष्ठ अधिकारीही काही दिवस गप्प बसून होते. मात्र आता डोक्यावरुन पाणी जावू लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडाळा आणि शिवडी पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावले.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भूखंडावर कब्जा करीत असलेल्या रोशन जयस्वाल, अन्सारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची लेखी विनंती मुंबई पोर्ट ट्रस्टने या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे. या माफियांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी दोन्ही पोलीस ठाण्यांनी हद्दीचा वाद निर्माण केला. आपल्या हद्दीत भूखंड येत नसल्याची सबब पुढे करून दोन्ही पोलीस ठाण्यांनी हात झटकायला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या या नव्या पवित्र्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारीही अवाक्  झाले आहे. पोलिसांनी निर्माण केलेला हद्दीचा वाद आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या दुबळ्या अधिकाऱ्यांमुळे या माफियांना रान मोकळे मिळाले असून ते पुन्हा भूखंडावर कब्जा करून लाखो रुपयांची माया गोळा करीत आहेत. परिणामी मोकळा केलेला भूखंड पुन्हा झोपडय़ांच्या वेढय़ात अडकू लागला आहे.