शिर्डी येथे अनधिकृतपणे साठवलेले घरगुती वापराच्या गॅसच्या १३० टाक्या जप्त करण्यात आल्या. जिल्हा पुरवठा विभागाने ही कारवाई केली.
शिर्डी येथे सचिन प्रकाश कोठारी हे भागवत गोंदकर यांच्या गाळय़ात गोकूळ गॅस एजन्सीच्या माध्यमातून रिलायन्स गॅस सिलेंडरची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांना मिळाली होती. त्यानुसार कासार व पुरवठा निरीक्षक माधव टिळेकर यांनी येथे अचानक तपासणी केली असता तेथे त्यांना भरलेल्या १५ व रिकाम्या २२ अशा ३७ घरघुती वापराचे तर वाणिज्य वापराच्या भरलेल्या २४ व रिकाम्या २० अशा ४४ गॅस सिलेंडर आढळले. ते जप्त करून या गोदामाला टाळे ठोकण्यात आले. शिर्डीतच सुपर गॅस एजन्सीत ४९ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. या दोघांकडेही गॅस वितरणाचा तसेच विस्फोटके साठवण्याचा अधिकृत परवाना नसल्याने त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आल्याचे कासार यांनी सांगितले.