शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कॉटेन मार्केटमधील भाजी विक्रेते आणि अडतियांना कळमना बाजारात जागा देऊन स्थानांतरित करण्यात आल्यानंतरही दीडशेपेक्षा अधिक अडतिया आणि भाजी विक्रेते ठाण मांडून बसले आहेत. महापालिका प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असून कुठलीही कारवाई केली जात नाही.
दीड वर्षांआधी महापालिकेने कॉटेन मार्केटमधील भाजी बाजार हा कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर स्थलांतरित करण्याची घोषणा केली. त्यावेळी अनेक विक्रेत्यांना महापालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने त्या ठिकाणी गाळे उपलब्ध करून दिले होते. त्यातील अनेक विक्रेते कळमनामध्ये जागा घेऊन कॉटेन मार्केटमधील जागा न सोडता त्यावर ताबा करून बसले आणि आजतागायत त्यांना हटविण्यात आले नाही. काही परवानाधारक भाजी विक्रेत्यांनी कॉटेन मार्केटमधून आपले बस्तान हलविले. त्यावेळी अडतिया संघाने कॉटेन मार्केटमधील भाजीबाजार हटणार नाही, असा पवित्रा घेतला होता. अडतिया आणि विक्रेते कळमनामध्ये जाण्यास तयार नव्हते त्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीस देऊन कळमनाला जाण्यास सांगितले.
लाखोंची उलाढाल असलेल्या या बाजारातून ४० ते ५० हजार लोकांना रोजगार मिळत आहे. शेतकरी कळमनामध्ये माल विकण्यास उत्सुक नाहीत. मात्र, महापालिका प्रशासन त्यांचे ट्रक नाक्यावर अडवून ते कळमन्याला पाठवितात. वाहनतळ व अन्य स्वरूपात महापालिकेला एक कोटी रुपये आणि सेसच्या स्वरूपात कळमना बाजार समितीकडे वर्षांला एक कोटी रुपये जमा होतात. स्वच्छता आणि पायाभूत सुविधांकडे दोघांचे दुर्लक्ष आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात दोन ते तीन बाजार असताना नागपुरात दोन बाजार का नाही? असा सवाल अनेक भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.
कॉटन मार्केट भाजी बाजारात ९ एकर परिसरात संकुल बांधण्याची घोषणा महापालिकेतर्फे करण्यात आली होती. १९९७ मध्ये स्थायी समितीमध्ये आणि सभागृहात तो प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी लाखो रुपये महापालिकेकडे जमा केले. या ठिकाणी २३८ दुकाने बांधली जाणार होती. शिवाय वाहनतळ, कार्यालय आणि सभागृह तयार करण्यात येणार होते. गेल्या दहा वषार्ंत केवळ नकाशा तयार करण्यात आला. मात्र आजपर्यंत हा प्रस्ताव कागदावर असून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि विकास कामेही झालेली नाहीत. बाजार परिसरात रस्ते तयार करण्यात आले नाहीत, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी आहे. एम्प्रेस सिटीमुळे कॉटेन मार्केटमधील भाजी बाजार हटवून तो कळमन्याला नेण्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक विक्रेते आणि अडतियांनी जागा सोडलेली नाही. त्यामुळे महापालिका या संदर्भात पुन्हा एकदा कारवाई करणार आहे काय, हे अनुत्तरीत आहे.