बेलापूर खाडीकिनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत ग्लास हाऊसला भुईसपाट केल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेचे सिडकोने सुशोभीकरण केले आहे. या मोकळ्या जागेचा फायदा उठवून त्या ठिकाणी अवैध प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यात आली असल्याचे दिसून येते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या अवैध जलवाहतुकीला रविवारी आक्षेप घेतला असून या ठिकाणी प्रवाशांची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे निर्देशनास आणले आहे. २८ प्रवाशी क्षमता असलेल्या या बोटीतून ४५ प्रवाशांची वाहतूक केली जात असून ते प्रवाशांच्या जीविताशी खेळणारे आहे. या प्रवाशांकडून प्रत्येकी ४०० रुपये तिकीट दर घेऊन एलिफंटा दर्शन करून आणले जात आहे.
नवी मुंबईला ६० किलोमीटरचा सागरी अर्थात खाडीकिनारा लाभला आहे. त्यामुळे या सागरी संपदेचा वापर करताना मध्यंतरी वाशी व बेलापूर येथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत हॉवरक्रॉफ्ट सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा कर्मचाऱ्यांच्या समस्येमुळे बंद पडली. मुंबई व नवी मुंबईला जोडणारी सागरी वाहतूक हवी, अशी मागणी विविध स्तरांवर केली जात आहे. मात्र नवी मुंबईच्या खाडीकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात खडक असल्याने या वाहतुकीला अडथळा येत आहे. बेलापूर येथील खाडीकिनाऱ्यावर वाळू उत्खननासाठी देण्यात आलेल्या भूखंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांचा भाचा संतोष तांडेल याने आलिशान ग्लास हाऊस बांधला होता. या अनधिकृत ग्लास हाऊसच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी याचिका दाखल केल्याने हे हाऊस तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे येथील सुमारे पाच एकर जमीन सिडकोच्या पुन्हा ताब्यात आली आहे. त्या ठिकाणी सिडकोने सुशोभीकरण केले आहे. याच ठिकाणी असलेल्या एका जुन्या फ्लोटिंग जेट्टीचा फायदा घेऊन सुट्टीच्या दिवशी काही जलवाहतूकदारांनी बेलापूर ते एलिफंटा प्रवाशी जलवाहतूक सुरू केली आहे. त्याला मंदा म्हात्रे यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रवाशी वाहतुकीत प्रवाशांसाठी लागणारी लाइफ जॅकेटसारख्या सुरक्षेची काळजीदेखील घेण्यात आली नसल्याचे निर्देशनास आणून दिले आहे. त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा या बोटीमध्ये जादा प्रवाशी वाहतूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद व मेरीटाइम बोर्डाकडे त्यांनी तक्रार केली आहे.