लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. याचदरम्यान दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणारी संशयितांची टोळकीही यंत्रणेच्या हाती लागत आहे. इंदिरानगर परिसरात आदल्या दिवशी संशयित दरोडेखोरांची एक टोळी जेरबंद झाली असताना दुसऱ्या दिवशी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या आणखी एका टोळक्यास पोलिसांनी जेरबंद केले.
वडाळा शिवारात हॉटेल आठवण समोर मध्यरात्री साडेतीन वाजता काही जण संशयास्पद स्थितीत अंधारात रिक्षातून फिरत असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी संबंधितांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे कुऱ्हाड, मिरचीची पूड, लाकडी दांडा व इतर काही हत्यारे असल्याचे निष्पन्न झाले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे संशयित फिरत असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी सागर एकनाथ जाधव (फुलेनगर), फारुक सुभान शहा, सागर रामदास शिंदे, किरण ऊर्फ बिटवा रमेश मल्हारी आणि इंद्या ऊर्फ विशाल वसंत बंदरे (सर्व रा. वडाळागाव) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील हत्यारे व रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रशांतनगर येथे पाच जणांच्या टोळक्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. हे संशयितही दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. लगोलग ही दुसरी संशयित दरोडेखोरांची टोळी हाती लागली. गेल्या काही महिन्यांपासून शहरात घरफोडय़ा व चोरीचे गुन्हे वाढत आहेत.
अल्पवयीन मुलीस पळविले
चित्रकलेच्या शिकवणीसाठी गेलेल्या तेरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीचे वडील सुनील वाळिंबे यांनी तक्रार दिली. गुरुवारी दुपारी वाळिंबे यांची मुलगी सीया चित्रकलेच्या शिकवणीसाठी गेली होती. तेथून ती घरी परत आली नाही. कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. अखेर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याची शंका वडिलांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.