बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन
बॉम्बे आर्ट सोसायटीचे १२१ अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शन २६ फेब्रुवारीपासून जहांगीर कला दालनात सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता आरपीजी समुहाचे चेअरमन हर्ष गोएंका यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रूपधर सन्मान आणि फाईन आर्टमधील जीवनगौरव पुरस्कार सोहळा होणार असून यंदाच्या कला प्रदर्शनात जलरंग, मिक्स मिडिया, तैलरंग, अ‍ॅक्रिलिक अशा विविध माध्यमांत देशभरातील विविध चित्रकारांची चित्रे, शिल्पकारांनी साकारलेली विविध माध्यमांतील शिल्पे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मुंबईकर कलाप्रेमींना मिळणार आहे. हे प्रदर्शन ४ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
‘विदिन’ चित्रप्रदर्शन
राहुल इनामदार यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘विदिन’ शुक्रवारपासून प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ संकुलातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कला दालनात सुरू होत आहे. शहरी मनाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करताना अंतर्मनात सुरू असलेला शोध या चित्रांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हे चित्रे कॅन्व्हासवर मिक्स मिडियम तसेच तैलरंग व अ‍ॅक्रिलिक माध्यमांतील आहेत. हे प्रदर्शन ३ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहता येईल.
अस्तित्व पारंगत एकांकिका पुरस्कार सोहळा
अस्तित्व पारंगत एकांकिका पुरस्कार सोहळा शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. यंदाच्या सोहळ्याच्या पोद्दार, महर्षी दयानंद, रुईया, उल्हासनगरेच सीएचएम महाविद्यालय, कीर्ती आणि सीकेटी इत्यादी महाविद्यालयांचे विद्यार्थी पारितोषिकप्राप्त स्कीट्स सादर करणार आहेत. त्याचबरोबर अभिनय, कल्याण निर्मित संजय कृष्णाजी पाटील यांच्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ या काव्यसंग्रहावर आधारित एका दीर्घ कवितेचे रंगमचीय सादरीकरण हेही यंदाचे आकर्षण ठरणार आहे.
‘द वर्ल्ड ऑफ रवींद्र साळवे’
चित्रकार रवींद्र साळवे यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘द वर्ल्ड ऑफ रवींद्र साळवे’ सध्या पु. ल. देशपांडे कला दालन, प्रभादेवी येथे सुरू झाले आहे. फॅण्टसीच्या जगात प्रवेश करून ग्रीक आकार आणि भारतीय मिनिएचरचा एकत्रित वापर करून काढलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दंतकथा आणि पौराणिक कथांवर आधारित चित्रेही यात आहेत. हे प्रदर्शन जहांगीर कला दालनात २५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
मराठी साहित्याविषयी व्याख्यान
महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड ऐरोली शाखेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता, म. बा. देवधर संकुल, सेक्टर १७, ऐरोली, नवी मुंबई येथे ‘आजचे मराठी साहित्य कालानुरूप आहे का?’ या विषयावर व्याख्यान तसेच कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध समीक्षक प्रतिभा कणेकर या वेळी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तसेच सतीश सोळांकुरकर, प्रतिभा सराफ आणि अंजली पेंढरकर या वेळी कविता वाचनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २७७९१८३७.