कमालीच्या उशिरा आलेल्या मान्सूनने कोरडय़ा दुष्काळाच्या सावटापासून शेतकऱ्यांची सुटका करून व सोयाबीन पिकाला संजीवनी देऊन आनंद निर्माण केला असला तरी सततच्या पावसाने आता मात्र सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशी आणि लष्कर अळी व मोझॅक रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे दुख ‘जैसे थे’ राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
उशिरा आलेल्या पावसामुळे कापसाचा पेरा मोठय़ा प्रमाणात कमी झाला त्याऐवजी शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला. पीक चांगले टरारले असतांना अतिपावसामुळे सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशी, लष्कर अळी आणि  मोझ्ॉक रोगाचे आक्रमण झाले आहे. पश्चिम विदर्भात सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्रावर  सोयाबीनची लागवड झाली आहे. पकी यवतमाळ जिल्ह्य़ातील साडे नऊ लाख हेक्टर जमिनीपकी पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्य़ांतील शेतकरी कापसाऐवजी सोयाबीनकडे वळला आहे. सुरुवातीपासून वरुणराजाने हुलकावणी देत कोरडय़ा दुष्काळाची स्थिती निर्माण केली होती. मात्र, नंतर पावसाने जबरदस्त साथ दिल्याने सोयाबीनची यशस्वी लागवड झाल्याच्या आनंदात शेतकरी होता. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशी, लष्कर अळी व मोझ्ॉकच्या प्रादुर्भावामुळे उत्पनात १५ ते ३० टक्के घट होणार आहे.
गेल्या वर्षी सुध्दा  ‘सोयाबीन मरत आहे’ ची ओरड करीत सोयाबीनची रोपटे घेऊन असंख्य शेतकरी कृषी विज्ञान केंद्रात धावले होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या येथील कृषीविज्ञान केंद्रात संशोधन अधिकारी असलेल्या डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यावर इलाज म्हणून शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर प्रचंड नुकसान होणार आहे.
प्रादुर्भाव खोडमाशीचा, पण उपचार बुरशीचा
सोयाबीनवर विविध रोगांचे आक्रमण झालेले असतांना त्या रोगांना ‘बुरशी’ समजून कीटकनाशकांऐवजी बुरशीनाशक औषधे अनेक कृषी केंद्रांकडून दिली जात असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांनी तातडीने कृषीविज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून योग्य तो उपचार आपल्या पिकांवर केला पाहिजे, असे आवाहन डॉ.प्रमोद यादगिरवार यांनी केले आहे. काही राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एसएमएस सेवा सुरू केली आहे. जिल्ह्य़ातील १० ते १५ हजार शेतकरी या सेवेचे लाभार्थी झाले आहेत, असेही डॉ. यादगिरवार यांनी सांगितले.