विदर्भ साहित्य संघाच्या वतीने वैदर्भीय कला संस्कृतीवर आधारित विदर्भस्तरीय चित्रानुभूती चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी, ५ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर अजेय गंपावार हे बहुळकर यांची प्रकट मुलाखत घेतील. ‘साप्ताहिेक विवेक’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘दृश्यकला चित्रकोष- खंड ६’ चे प्रकाशन त्याच दिवशी रविवारी सायंकाळी सहा वाजता होईल. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक वसंत आबाजी डहाके, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, ज्येष्ठ पत्रकार  दिलीप करंबेळकर, कला समीक्षक दीपक घारे, डॉ. मनीषा प्रभाकर पाटील प्रामुख्याने उपस्थित राहतील. वि.सा.संघाच्या सांकृतिक संकुलातील चवथ्या मजल्यावरील कलादालनात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चित्रानुभूतीच्या दुसऱ्या पर्वात ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता बहुळकर यांच्या व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षिक होईल तर चित्रानुभूती स्पध्रेचे पारिताषिक वितरण बहुळकर यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होईल. चित्रानुभूती चित्रप्रदर्शनाकरिता संपूर्ण विदर्भातील व्यावसायिक चित्रकारांकडून विदर्भातील मानबिंदूंवर आधारित चित्रे मागविण्यात आली होती. गडचिरोली, पुसद, अकोला, अमरावती, मूल, भंडारा आदी ठिकाणांवरून ७५ ते ८० चित्रे स्पर्धेकरिता प्राप्त झाली असून एकटय़ा नवरगाव येथून २५ स्पर्धकांनी स्पध्रेत सहभाग घेतला आहे. या स्पध्रेतील तसेच इतरही चांगल्या चित्रांचा संग्रह वि.सा. संघातील कलादालनात करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला वामन तेलंग, शोभा उबगडे, प्रकाश एदलाबादकर, कोषाध्यक्ष विलास मानेकर उपस्थित होते.