राज्यातील कोणत्याही कारागृहात अथवा पोलीस ठाण्यात अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली जाणार आहे. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी भ्रमणध्वनी क्रमांक दिला जाणार आहे. तेथील अधिकाऱ्याची बदली झाली तरी तो क्रमांक नवीन अधिकाऱ्याकडे येईल. जेणेकरून सर्वसामान्यांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी एकाच क्रमांकावर संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी उपलब्ध असतील, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले. गुरुवारी नाशिकरोड कारागृहात सुधारवाणी या उपक्रमाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी, झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत पत्रकारांशी ते बोलत होते.
नाशिकरोड कारागृह वेगवेगळ्या वादग्रस्त घडामोडींमुळे नेहमी चर्चेत असतो. कारागृहात कैद्यांकडे भ्रमणध्वनी सापडण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. असे गैरप्रकार रोखण्यासाठी शासन काय करणार, या प्रश्नावर शिंदे यांनी भावी योजनांची माहिती दिली. राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात अचानक भेट देऊन कामकाजाची तपासणी करण्याचा विचार आहे. त्या वेळी आपण कोणत्या पोलीस ठाण्यात जाऊ हे पोलिसांना समजणार नाही. कारागृहात घडणारे गैरप्रकार रोखण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यावर स्थानिक नागरिकांची अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी कायमस्वरूपी भ्रमणध्वनी देण्याचा प्रयत्न आहे. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली तरी नव्या अधिकाऱ्याकडे तो भ्रमणध्वनी क्रमांक येईल. यामुळे नागरिकांना आपल्या भागातील पोलीस ठाण्याकडे तक्रार करणे सुकर होईल, असे ते म्हणाले.
नाशिकरोड कारागृहात सुधारवाणीच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंदी चांगला बोध घेतील आणि बंदिजनांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याआधी हा उपक्रम तिहार व येरवडा कारागृहात राबविण्यात आला. बंदिजनांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याचा भाग म्हणून नाशिक येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामुळे बंदिजनांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत मिळेल.
वाईट विचारातून बाहेर येत आयुष्य सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना प्रेरणा
मिळावी हा उद्देश आहे. चांगल्या जीवनपद्धतीसाठी हा उपक्रम उपयुक्त असून कारागृहाबाहेर गेल्यावर चांगले नागरिक म्हणून ते समाजात वावरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी शिंदे यांनी कारागृहाची पाहणी केली. बंदिजनांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेतली. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, कारागृह अधीक्षक जयंत पाटील उपस्थित होते.

सुधारवाणीचे कार्यक्रम
सुधारवाणीच्या माध्यमातून सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या कालावधीत कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. त्यात ‘ए मालिक तेरे बंदे’ हे गीत, दैनिक बातम्या, भावगीत व भक्तिगीत, सुगम संगीत, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तज्ज्ञांच्या मुलाखती, नियमावली, राष्ट्रीय सणांचे महत्त्व, ग्रंथ परिचय आदींचा समावेश आहे.