विधानसभा निवडणुका एक महिन्यावर आलेल्या असताना विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या नेत्यांची संख्या वाढल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होत आहे. गेल्या काही दिवसांत विदर्भात विशेषत: भाजप-शिवसेनेमध्ये अशा नेत्यांची संख्या वाढत असताना पक्षातील निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.  
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आता शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तर भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रांग लागली असताना त्यात आता विदर्भ मागे नाही. अनेक वर्षे सतरंज्या उचलण्यापासून पक्ष संघटन मजबूत करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते कामच करीत असताना निवडणूक आली की त्यांना केवळ आश्वासने दिली जातात आणि ऐनवेळेवर नव्याने पक्षांतर केलेल्या नेत्याला उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला जातो. सतरंज्या उचलणारे अनेक कार्यकर्ते त्याच जागी आहे. दक्षिण नागपूर आणि काटोल मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे दोनपैकी कुठल्याही एका जागी उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले किशोर कन्हेरे पक्षातील वरिष्ठाच्या संपर्कात असून त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शेखर सावरबांधे दक्षिण नागपूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यासाठी ते गेल्या पाच वषार्ंपासून काम करीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना उमेदवारी देणे निश्चित झाले असताना ऐनवेळेवर भाजपच्या राजकारणामुळे किशोर कुमेरिया यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, ते पराभूत झाले होते. दक्षिण नागपूर शिवसेनेकडे असताना भाजपचे काही नेते या मतदारसंघावर दावा करीत आहेत. समजा दक्षिण नागपूर भाजपकडे गेला तर पुन्हा सावरबांधे यांच्यावर अन्याय होण्याची चिन्हे आहेत. किरण पांडव हे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ते सुद्धा पराभत झाले होते. काटोलमध्ये अनेक निष्ठावंतांवर त्यावेळी अन्याय झाला असताना त्याची पुनरावृत्ती यावेळी होते की काय? याकडे काटोलमधील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. उमरेडमध्ये काँग्रेसचे राजू पारवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यावर ते उमरेडमधून इच्छुक आहेत. भाजपमध्येही प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या बरीच असून तेही केवळ उमेदवारीसाठी पक्षात आले आहेत.
मोहन मते पूर्वी भाजपमध्ये होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ते पक्षातून बाहेर पडले आणि आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही परतले आहेत.
शिक्षण क्षेत्रात मोठे नाव असलेले ज. मो. अभ्यंकर यांनी चार वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून ते उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. अशा नेत्यांमुळे पक्षातील निष्ठावंतांनी वर्षांनुवर्षे केवळ सतरंज्या उचलण्याचे काम करावे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.