उन्हाळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मोठय़ा प्रमाणात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाचा वावर असताना गेल्या काही दिवसात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच अधिष्ठाता आणि विभाग प्रमुखांनी गेल्या अनेक महिन्यांपासून वॉर्डांमध्ये निरीक्षण दौरे बंद केल्यामुळे अनेक विभागातील कर्मचारी आणि डॉक्टरांवर वचक राहिलेला नाही.
आशियातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची ख्याती असून विदर्भासह छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशमधून मोठय़ा प्रमाणात रुग्ण येत असताना रुग्णांची काळजी घेतली जात नसल्यामुळे त्याचा त्रास रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे. शासनाने ३० विविध विभागांसह अनेक वॉर्ड, रक्तपेढी, बाह्य़रुग्ण विभाग तयार केले असून प्रत्येक विभागात विभाग प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांसह परिचारिकांची चमू तयार करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात विभाग प्रमुखांनी वॉर्डांची जबाबदारी निवासी डॉक्टरांवर सोपविली असून आठ आठ दिवस विभाग प्रमुख जाऊन पहात नसल्याची माहिती मिळाली नाही.
मेडिकलच्या प्रत्येक विभागात आणि वॉर्डात अनेक समस्या असून त्याकडे कोणी पहात नाही. या सर्व विभागात रुग्ण उपचार घेत असल्याने तेथील स्वच्छता बघण्यासह रुग्णांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि विभाग प्रमुखांनी निरीक्षण दौरे करणे गरजेचे आहे. मात्र, या अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून दौरे केले नसल्यामुळे मेडिकल परिसरातील व्यवस्था विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. शिवाय, मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार महिन्यातून किमान १० ते १२ दिवस रजेवर असतात. त्यामुळे विभाग प्रमुख आणि कर्मचारी आणि काही डॉक्टरांवर वचक राहिलेला नाही.
निवासी डॉक्टरांच्या भरवशावर अनेक वॉर्ड सुरू असून आता त्यांनीही विभाग प्रमुख आणि अधिष्ठात्यांच्या विरोधात उघडपणे बोलणे सुरू केले आहे. डॉ. राजाराम पोवार पुढच्या महिन्यात पुन्हा एक महिन्याच्या सुटीवर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गेल्या काही दिवसात पुन्हा मेडिकलमध्ये दलालांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्यावर कोणाचा वचक नाही. खाजगी अ‍ॅम्बुलन्स मेडिकल परिसरात दिसू लागल्या आहेत. मेडिकल प्रशासनाने या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. मेडिकलमधील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्यामुळे आणि अनेक वॉर्डात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झााल्याचे रुग्णांच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे. बाह्य़ रुग्ण विभागात अधिकाऱ्यांनी भेटी देणे बंद केल्याने अनेक वरिष्ठ डॉक्टर व प्राध्यापक विलंबाने येणे अथवा न येण्याचा उपक्रम रुग्णालयात सुरू झाला आहे.