विदर्भात गेल्या वर्षी जूनअखेपर्यंत झालेल्या सरासरीच्या २३२ टक्के पावसाचा उच्चांक आणि यंदा सरासरीच्या केवळ २८.४ टक्केच झालेला पाऊस. निसर्गचक्रातील दोनच वर्षांतील या तफावतीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही चक्रावून सोडले आहे. जून महिना संपत आलेला असताना देखील तापमानात लक्षणीय वाढ अनुभवली जात असून विदर्भातील अनेक शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान बुधवारी नोंदवले गेले. दुसरीकडे पेरण्याही खोळंबल्या आहेत. आतापर्यंत विदर्भात केवळ १.१९ टक्के क्षेत्रातच पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी २६ जूनपर्यंत अमरावती विभागात ३०९.३ मि.मी. म्हणजे सरासरीच्या तब्बल २३२.२ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत ३३ मि.मी. पाऊस झाला आहे. अमरावती विभागाची जूनअखेरची सरासरी १३२.२ मि.मी. पावसाची आहे. सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झाल्याने आणि अजूनही मान्सून सक्रिय होण्याचे संकेत दिसत नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडले आहे. नागपूर विभागात गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ३६२.४ मि.मी. म्हणजे २२३.३ टक्के पाऊस झाला होता. जूनअखेपर्यंत नागपूर विभागात सरासरी १६३ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना केवळ ५२.२ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत हे प्रमाण ३१.९ टक्के आहे. जूनच्या पावसानेच गेल्या वर्षी धरणांमधील जलसाठय़ात चांगली सुधारणा घडवून आणली होती, पण यंदा चित्र उलटे आहे. अनेक मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे.
 पाऊसच आलेला नसल्याने येत्या काही दिवसात पेयजलसंकट तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, तापमानाचा पारा खाली उतरलेला नाही. ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला या शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअस च्या आसपास तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्यांना भंडावून सोडले आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पेरण्या सुरू केल्या, पण विदर्भात बहुतांश शेती ही कोरडवाहू असल्याने पावसाअभावी पेरण्या अडल्या आहेत. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील पेरणीखालील सरासरी १८ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ १३ हजार हेक्टर म्हणजे ०.७ टक्के क्षेत्रातच पेरण्या झाल्या आहेत.
अमरावती विभागातील सरासरी पेरणीखालील ३२ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत ५५ हजार हेक्टर म्हणजे केवळ १.६८ टक्के क्षेत्रातच पेरणी होऊ शकली. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना रोपे जगवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. गेल्या १८ जूनला विदर्भात सार्वत्रिक पाऊस झाला. काही जिल्ह्य़ाांमध्ये तर ३० ते ४० मि.मी.पर्यंत पावसाची नोंद झाली, पण इतर सर्व दिवस कोरडे गेले. काही भागात फुटकळ पाऊस झाला. पावसाच्या या लहरीपणाचा परिणाम पीक नियोजनावर झाला आहे. दुष्काळाची ही चाहूल मानली जात आहे. दुष्काळाचे चटके सातत्याने सोसणाऱ्या विदर्भात गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाला होता, काही ठिकाणी अतिवृष्टीचेही थमान होते. तरीही धरणांमधील जलसाठे तुडूंब भरल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. आता अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये २० टक्क्यांपर्यंत जलसाठा शिल्लक आहे. साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत चांगला पाऊस अपेक्षित असतो, पण महिना कोरडा गेल्याने चिंता वाढली आहे.