मुंबईतील राहणीमान महिलांसाठी अत्यंत सुरक्षित असल्याचे म्हटले जात असले, तरी महिलांसाठी रेल्वे प्रवास काहीसा धोकादायक होत चालला असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. २०१२च्या तुलनेत रेल्वेमार्गावर घडलेल्या गुन्हय़ांमध्ये तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. यापैकी विनयभंगाचे गुन्हे सर्वाधिक असून त्याखालोखाल अश्लील हावभाव करणाऱ्यांची संख्या आहे. या गुन्हय़ांपैकी ९० टक्के गुन्हय़ांची उकल लोहमार्ग पोलिसांनी केली आहे.
मुंबईच्या रेल्वेमार्गावर महिलांविषयक गुन्हय़ांच्या घटना २०१०मध्ये वर्षभरात फक्त २७ एवढय़ाच होत्या. त्या वेळी विनयभंगाच्या घटना १५ होत्या. म्हणजेच एकूण गुन्हय़ांपैकी ५० टक्क्यांहून अधिक घटना विनयभंगाच्याच होत्या. २०११मध्ये मात्र या गुन्हय़ांची संख्या २६ होती. २०१२पासून या गुन्हय़ांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. २०१२मध्ये ३७, २०१३मध्ये ६९ आणि २०१४मध्ये ७३ महिलाविषयक गुन्हे रेल्वेमार्गावर घडले आहेत.
गेल्या तीन वर्षांतील १७९ गुन्हय़ांपैकी विनयभंगाप्रकरणी ११७ गुन्हय़ांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अश्लील हावभाव केल्याप्रकरणी २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या एकूण १७९ गुन्हय़ांपैकी १६६ गुन्हय़ांची उकल करण्यात आली असून गुन्हेगारांवर कारवाईही झाली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांतील या वाढत्या गुन्हय़ांबद्दल रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आम्ही ठोस उपाययोजना करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडल्या गेलेल्या पुरुषांची संख्या ५३३० एवढी आहे. यापैकी काही पुरुष अनवधानाने महिलांच्या डब्यात शिरले होते. तर काही जणांनी मुद्दाम महिलांचा डबा गाठला होता. २०१३मध्ये ही संख्या २७१५ होती, तर २०१४मध्ये २६१५ पुरुषांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आले.
6