सुट्टीचा दिवस होता.. निवांतपणे उठू असा विचार करीत बिछान्यावरच लोळत पडलो होतो.. तेवढय़ात मोबाइल वाजला.. ‘कसाबला फाशी दिली..’ असे मित्राने सागितले अन् चार वर्षांपूर्वी हॉटेल ट्रायडंटमध्ये घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.. ट्रायडंटमधील अग्निप्रतिबंध आणि सुरक्षा अधिकारी नंदकिशोर रामजी निजामपूरकर सांगत होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी सकाळच्या पाळीचे काम संपवून दुपारी ४ वाजता मी घरी गेलो. रात्री सव्वादहा वाजता हॉटेलमधून फोन आला. हॉटेलमध्ये गोळीबार सुरू होता. मी प्रमुख सुरक्षा अधिकारी कमांडंट सुशील नागमोते यांच्याशी संपर्क साधाला. त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत तात्काळ हॉटेलमध्ये या, अशी सूचना केली. मी पोहोचलो, तेव्हा हॉटेलमधून गोळीबाराचे आवाज येत होते. पोलिसांनी हॉटेलला वेढा घातला होता. मी आत गेलो आणि नागमोते यांच्यापुढे उभा राहिलो. देशी-विदेशी पाहुणे आणि कर्मचारी अशा ३०० जणांना रिगल रूममध्ये ठेवले होते. तेथील दिवे मालविण्यात आले होते. या सर्वाना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करीत होते. ते रिगल रूममध्ये आले असते तर ३०० जणांना प्राण गमवावे लागले असते. काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन या ३०० जणांना हॉटेलच्या प्रवेशद्वार क्रमांक ६ मधून बाहेर काढले आणि आयनॉक्सजवळ सुखरूप सोडले..

आज त्या आठवणींची उजळणी करताना निजामपूरकरांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट उमटले होते..

कामगिरी फत्ते झाल्यानंतर आम्ही हॉटेलमधील सुरक्षा विभागात आलो. तेथील सीसी टीव्हीवरून दहशतवाद्यांच्या हालचाली न्याहाळू लागलो. फ्रेंचीपानी रेस्टॉरंटच्या बाहेर दोन दहशतवादी टॅक्सीतून उतरले आणि थेट गोळीबार करीतच त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे घाबरलेल्या काहीजणांनी एका विभागात धाव घेतली. त्यांच्यामागे गेलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करीत काही कर्मचारी आणि पाहुण्यांना ठार मारले. टिफिन सेंटरमध्ये १२ पाहुणे जेवत होते. त्यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविले. खंदा रेस्टॉरंटमध्ये गोळीबार करीत दहशतवादी १८ व्या मजल्यावरील खोली क्रमांक १८५६ मध्ये घुसले. तेथूनच ते हातबॉम्बही फेकत होते. तोपर्यंत सुरक्षा पथकाचे जवान ट्रायडंटमध्ये थडकले. हॉटेलची रचना माहीत नसल्यामुळे दहशतवाद्यांचा मुकाबला कसा करायचा, असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे त्यांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाबरोबर एक छोटेखानी बैठक घेतली. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग मला माहीत असल्यामुळे नागमोते यांनी मला बोलावले आणि जवानांना खोली क्रमांक १८५६ पर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. एक हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जाकिट परिधान करून मी ट्रायडंटमधील जलतरण तलावाजवळून नर्सरीच्या दिशेला त्यांना घेऊन गेलो. ‘फायर एक्झिट’मधून १८ व्या मजल्यावर आलो. खोली क्रमांक १८५६ समोर होती. नियोजित लक्ष्य डोळ्यासमोर येताच राष्ट्रीय सुरक्षा पथकातील जवानांनी मला माघारी पाठविले. अनेक पाहुणे आपापल्या खोल्यांमध्ये अडकले होते. त्यांना खाद्यपदार्थ पोहोचविण्यासाठी मी आणि माझे सहकारी सावधगिरी बाळगत फिरत होतो. कुणीही दरवाजा उघडत नव्हते. त्यामुळे खोलीच्या दरवाजाबाहेर खाद्यपदार्थ देऊन आम्ही सुरक्षितस्थळी रवाना होत होतो.

राष्ट्रीय सुरक्षा पथकातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होता. दहशतवादी हॉतबॉम्बचा मारा करीत होते. हॉटेलला युद्धभूमीचेच स्वरूप आले होते. अखेर गुरुवारी (२७ नोव्हेंबर २००८) एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. मात्र दुसरा अतिरेकी बेछूट गोळीबार करीतच होता. शुक्रवारी पहाटे ५ वाजता त्याचाही खातमा झाला.. मुंबईवर हल्ला चढविणाऱ्या क्रूरकर्मा कसाबला फासावर चढविल्याने आज त्या समाधानात आणखी भर पडली..