शहरात अवैध धंदे, लूटमार, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ, अशा घटना घाऊक प्रमाणात सुरू असताना पोलीस यंत्रणेकडून जणू काही आपण या गावचेच नाही अशी भूमिका घेतली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील सुरक्षेचे सूक्ष्म नियोजन करण्यात पोलीस आयुक्त गुंतले असून, परिणामी सद्यस्थितीत शहरात पोलिसांचे कोणतेही अस्तित्व दिसत नाही. उलट शहरातील वाढत्या अवैध धंद्यांविषयी माहिती असूनही पोलिसांचेच अभय मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नाशिककर त्रस्त असताना याविरोधात आवाज उठविण्यासाठी एकही राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याचे विदारक चित्र आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीने आता कळस गाठला असून, नाशिककरांना आयुक्त सरंगल यांनी सूत्रे हाती घेण्यापूर्वीच्या स्थितीची आठवण सध्याच्या दिवसांमुळे येत आहे. त्या काळी गुन्हेगारांच्या हैदोसामुळे नाशिककरांना सळो की पळो करून सोडले होते. पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात सर्वसामान्य नाशिककरांच्या बरोबरीने उद्योजकही रस्त्यावर उतरले होते. सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा तसेच काही करण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. नाशिककरांना वाऱ्यावर सोडून पोलीस आयुक्त सिंहस्थाचे कसले नियोजन करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण शहरात सर्वत्र कमी-अधिक आढळत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा नित्यनेमाप्रमाणे होऊ लागल्या आहेत. वाहनांच्या जाळपोळीची ‘नाशिक पद्धत’ आता औरंगाबादमध्येही रुजू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी तेथेही वाहन जाळपोळीच्या घटना घडल्या. पंचवटीतील दिंडोरी रस्त्यावर पुन्हा एकदा दुचाकींची जाळपोळ करण्यात आल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक गुंडापुंडांना पुन्हा जोर आला असून त्यांच्या विरोधात पोलिसांकडे गेल्यावर तक्रारकर्त्यांचीच समजूत घालून पोलिसांकरवी बोळवण करण्याचे प्रकार घडत आहेत.
अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट झाला असून, आतापर्यंत काही ठरावीक भागापर्यंत मर्यादित असलेल्या या धंद्यांचे जाळे आता इतरत्रही विस्तारले आहे. पंचवटीतील अमृतधाम परिसर हा त्यापैकी एक. अमृतधामजवळील औदुंबरनगरमागील भागात जुगारासह देहव्यापाराचा अड्डा सुरू असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असलेले संशयित या प्रकारणात गुंतलेले असून त्यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्यांना दमदाटी होत असल्याने या संशयितांची हिंमत वाढतच आहे. या जुगारी अड्डय़ावर अनेक प्रतिष्ठितही हजेरी लावत असून त्यांच्या गाडय़ा परिसरातील कॉलन्यांच्या रस्त्यावर कुठेही उभ्या करण्यात येत असल्याने त्याचाही नागरिकांना त्रास होत आहे. पोलिसांना या अड्डय़ाविषयी सर्व काही माहीत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे. स्थानिकांकडून तक्रार येण्याची वाट पाहण्याऐवजी पोलीस थेट या अड्डय़ावर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कॅमेऱ्याद्वारे या अड्डय़ाचे गुप्तपणे चित्रण करून ते पोलीस आयुक्तांसह सार्वजनिकरीत्या दाखविण्याचा इरादा स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असल्याचे आणि पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे हे तर केवळ प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. अशीच स्थिती इतरत्रही आढळून येत आहे. अशाच प्रकारच्या अवैध धंद्यांमधून उद्भवलेल्या वादातून नाशिकरोड परिसरात अलीकडेच गोळीबाराची घटना घडली होती. अवैध धंद्यांप्रमाणेच सोनसाखळी चोरटय़ांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वाहन तपासणी याआधी नियमितपणे आणि कठोरपणे होत होती. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटनांना काही अंशी पायबंद बसला होता. परंतु अलीकडे वाहन तपासणीचे प्रमाण एकदमच कमी झाले. परिणामी सोनसाखळी चोरटय़ांचे चांगलेच फावले असून, सोनसाखळी हिसकावून कोणत्याही रस्त्याने पळून जाण्यात ते यशस्वी होत आहेत. शहरातील वाहनधारकांच्या बेशिस्तीकडेही पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच दुचाकीवरून तीन जणांनी प्रवास करणे हे चित्र आता नाशिकमध्ये नेहमीचे झाले आहे.
आपणास अडविण्याची कोणत्याही वाहतूक पोलिसाची हिंमत नसल्याची ठाम समजूत बेशिस्त वाहनधारकांची झाली आहे.
वाहनधारकांच्या या बेशिस्तीमुळेच महात्मा गांधी रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभी करण्यात आलेली वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशा विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सध्या नाशिककर अडकले असून पोलीस मात्र तीन महिन्यांनी सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकची सुरक्षा व्यवस्था कशी राहील, याचे नियोजन करण्यात गुंग आहेत.