मुंबईमध्ये ठिकठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून तब्बल १८२५ कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कचराकुंडय़ा मुंबईत ठिकठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये ठिकठिकाणी १.१ घनमीटर क्षमतेच्या सहा हजार कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. कचऱ्यातील आम्ल गुणधर्म आणि दमट हवामानामुळे गंजून या कचराकुंडय़ा कुचकामी ठरतात. गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेने २४०० कचराकुंडय़ा खरेदी करून विविध भागांमध्ये त्या उपलब्ध केल्या होत्या. आता आणखी १८२५ कचराकुंडय़ा खरेदी करण्याचा पालिकेचा मानस आहे. प्रती नग ३२,५९० रुपये दराने एकूण पाच कोटी ९४ लाख ७६ हजार ७५० रुपयांना स्पन सिटी कंपनीकडून या कचराकुंडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबईकर आणि नगरसेवकांकडून मागणी वाढू लागल्याने पालिका आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारामध्ये अलीकडेच १५३ कचराकुंडय़ा खरेदी केल्या होत्या. वाढती गरज लक्षात घेऊन आता आणखी १८२५ कचराकुंडय़ा खरेदी करण्यात येत आहेत.