विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात मतदारांमध्ये जाणवलेला उत्साह..ठिकठिकाणी लागलेल्या रांगा..लक्ष्मीदर्शनाची चर्चा..पंचरंगी लढतींमुळे एकेका मताला आलेले महत्व, या सर्व कारणांमुळे मतदानाच्या टक्केवारीत विलक्षण वाढ झाली. जिल्ह्यातील सहा मतदारसंघांनी तर टक्केवारीत सत्तरी पार केली. या मतदारसंघांमधील निकालाबाबत सर्वानाच उत्सुकता होती. अधिक मतदान हे त्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या विरोधात असते असे मानले जाते. या सहाही मतदारसंघातील निकालावरूनही तेच वास्तव समोर येत असून केवळ दोनच ठिकाणी विद्यमान आमदारांना आपली जागा कायम राखण्यात यश आले आहे.
सर्वाधिक ७४.९० टक्के मतदान झालेल्या दिंडोरीत अंदाज वर्तविणे सर्वानाच कठीण झाले होते. विशेषत: युवावर्गाने मोठय़ा प्रमाणावर दिलेला प्रतिसाद सर्वानाच चक्रावून सोडणारा ठरला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा युवावर्गास भाजप आणि शिवसेनेने अधिक आकर्षित केले असले तरी या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कमकुवत असल्याने युवावर्गाचे मतदान विभागले गेल्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत युती असतानाही शिवसेनेचे धनराज महाले यांना विजयासाठी झगडावे लागले होते.  अवघ्या ३०० मतांनी त्यांचा विजय झाला होता. यावेळी भाजपची साथ नसल्याने महाले यांची अवस्था बिकट मानली जात होती. त्यातच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारादरम्यान दिंडोरीकडे दुर्लक्ष केले. त्याचाही फटका महाले यांना बसल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीची तालुक्यातील सर्व नेतेमंडळी नरहरी झिरवाळ यांच्यामागे उभी राहिली. परिणामी झिरवाळ हे १२ हजार ६३३ मताधिक्याने विजयी झाले.
निफाड मतदारसंघात ७३.७३ टक्के मतदानाची नोंद झाल्याने ही परिवर्तनाची घंटा असल्याचे मानले जात होते. मतदानाच्या वाढीव टक्केवारीमागे अफाट प्रमाणात मतदारांना करण्यात आलेले ‘लक्ष्मीदर्शन’ हे कारण सांगितले गेले. राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आणि शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात प्रमुख लढत झाली. मतदारसंघात पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील मतदान सर्वाधिक आहे. त्यात पिंपळगाववर बनकरांचे तर ओझरवर कदमांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावल्याचे निकालावरून दिसते. कदम यांच्याविषयी असलेली नाराजी आणि वैकुंठ पाटील हा भाजप उमेदवार यामुळे कदम यांना विजय अवघड असल्याचे मानले जात होते. परंतु वैकुंठ पाटील यांनी कदमांच्याच मतपेटीवर १८ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन डल्ला मारला असतानाही कदम हे तीन हजार ९२४ मताधिक्याने विजयी होण्यात यशस्वी झाले.
७२.२१ टक्के मतदानाची नोंद झालेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविण्यात येत होती. निकालही तसाच लागला. कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी केली तरी विजय निश्चित असे वलय स्वत:भोवती निर्माण केलेले ज्येष्ठ नेते ए. टी. पवार यांना यावेळची निवडणूक ही अगदी उमेदवारी मिळविण्यापासूनच अडचणीची ठरत गेली. या निवडणुकीत कोणतीच गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे घडली नाही. त्यातच त्यांच्याच तालुक्यातील यशवंत गवळी हे भाजपकडून उभे राहिल्याने पवार जणूकाही खिंडीत गाठले गेले. गवळी यांना प्रचारादरम्यान मिळालेला पाठिंबा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना चकित करणारा ठरला. गवळी आणि पवार यांच्यात कळवण तालुक्यात मतविभागणी होऊन
त्याचा थेट फायदा सुरगाणा तालुक्यातील माकपचे उमेदवार जीवा पांडु गावित यांना होणार असल्याचे आडाखे मांडण्यात येत होते. निकालातही त्याचे प्रतििबंब दिसून आले. परिस्थिती प्रतिकूल असतानाही पवार यांना अवघ्या चार हजार ७८६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. याचाच अर्थ गवळी यांची उमेदवारी नसती तर पवार यांचा विजय निश्चित होता.
आक्रमक कार्यशैली आणि जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादीचे बलाढय़ नेते छगन भुजबळ यांना थेट आव्हान देण्याची हिंमत यामुळे काँग्रेसमध्ये दबदबा निर्माण केलेल्या माणिक कोकाटे यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर काँग्रेसऐवजी भाजपकडून नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चांगलाच फसला. सिन्नर मतदारसंघात ७१.६४ टक्के मतदान झाल्याने हे मतदान कोकाटे यांच्यासाठी धडकी भरविणारे असल्याचे म्हटले जात होते. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपची उमेदवारी घेणारे कोकाटे यांची लढत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी झाली. स्वत:ची हक्कीची काही मते आणि मोदी लाट  कोकाटे यांच्या कामी येईल, असे म्हटले जात होते. परंतु राष्ट्रवादीतील अनेकांसह तालुक्यातील जवळपास सर्वच कोकाटे विरोधकांनी वाजे यांना केलेली मदत लपून राहिली नाही. त्यातच वंजारी समाजानेही वाजे यांची पाठराखण केली. पंकजा मुंडे यांची जाहीर झालेली सभा अचानक रद्द झाल्याने वंजारी समाजाला वाजे यांच्यामागे उभे राहण्याचा संदेश मिळाल्याची चर्चा रंगली. या सर्व कारणांमुळे विकास कामे करूनही कोकाटे यांना २० हजार ५५४ मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला.
चांदवड-देवळा मतदारसंघात ७१.५८ टक्के मतदान झाले. हे वाढीव मतदान भाजपचे डॉ. राहुल आहेर यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. निकालही या अंदाजाप्रमाणेच लागला. काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांना प्रारंभी ही निवडणूक सहजसोपी मानली जात होती. परंतु राष्ट्रवादीचे उत्तम भालेराव, अपक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचीही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोतवाल यांना धोक्याची जाणीव झाली. कोतवाल, भालेराव आणि कुंभार्डे यांच्यात झालेली चांदवडची मतविभागणी देवळ्याचे डॉ. आहेर यांच्या पथ्थ्यावर पडली. भाषिक आणि प्रादेशिकतेमुळे देवळा तालुक्यातील जनता डॉ. आहेरांच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे ११ हजार १६१ चे मताधिक्य घेत डॉ. आहेर यांनी कोतवाल यांचा पराभव करून मतदारसंघात परिवर्तन घडविले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या येवला मतदारसंघात ७०.६६ टक्के मतदान झाल्याने निकालाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांची वाट शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यामुळे बिकट झाल्याचे मानले जात होते. परंतु मुरब्बी भुजबळ यांनी पध्दतशीरपणे राजकीय रिगणातील आपल्या विरोधातील एकेक उमेदवार कमी करून त्यांना आपल्या तंबुत खेचले. काँग्रेसच्या उमेदवाराने
तर थेट माघारच घेतली. त्याचवेळी पवार हे एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. तरीही मतमोजणीत प्रारंभी भुजबळ हे पिछाडीवर गेल्याने अनेकांना राजकीय चमत्कार होईल की काय असे वाटू लागले होते. अखेरीस भुजबळ यांनी ४६ हजार ४४२ मताधिक्याने पवार यांच्यावर मात करून मतदारसंघात विजयाची हॅट्रीक केली.