राज्यात एक कोटी, तर देशात १० कोटी भाजपचे सदस्य करण्याचा आमचा संकल्प आहे. या आठवडय़ात महाराष्ट्रातील पाच अपक्ष आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असून टप्प्याटप्याने राज्यातील कॉंग्रेसचे २० माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे- पाटील यांनी शनिवारी येथे केला.
स्थानिक स्वागत लॉनमध्ये शनिवारी आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार दानवे म्हणाले, आमचे सरकार स्थिर आहे. आम्ही मित्रपक्ष फोडणार नाही. भाजपमध्ये मुंडे-महाजन आता होणार नाहीत, परंतु आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेचे धडे घेतले असून, त्यांच्याच कार्य करण्याच्या पध्दतीने आम्ही आणि भाजपचे पदाधिकारी पक्ष संघटनेचे कार्य करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट  केले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम विभागीय व नंतर जिल्ह्य़ाचे दौरे केले. या माध्यमातून महाराष्ट्रात १ कोटी भाजपचे सदस्य करण्याचा आमचा संकल्प आहे. आजपर्यंत राज्यात ८० लाख सदस्यांनी नोंदणी झाली आहे. येत्या १५ दिवसात आमचा संकल्प पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी राज्यात मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली आहे. केंद्र शासनानेही नुकतेच राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी २००० कोटी रुपये दिले आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडत असून, शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी आमचा पुढाकार राहील याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
स्वतंत्र विदर्भासाठी भाजप अनुकूल आहे. शिवसेनेचा विरोध कायम आहे, परंतु राज्यात भाजपचे १४५ आमदार झाल्यानंतर हा प्रश्न निकालात निघेल, असा आशावादही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी खासदार संजय धोत्रे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार विजय जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे, नरेंद्र गोलेच्छा, राजू पाटील राजे, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश
शनिवारी स्थानिक स्वागत लॉनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, रिसोड पंचायत समितीच्या सभापती यशोदा भाग्यवंत, रणजित पाटील, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद गडेकर यांच्यासह मनसे, मनविसे, महिला आघाडीचे माजी पदाधिकारी आणि मनसेच्या शेकडो माजी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.