भारत आणि ब्रिटनमध्ये व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना ‘दादाभाई नौरोजी पुरस्कारा’ने सन्मानित केले जाईल, अशी घोषणा ब्रिटनचे उपपंतप्रधान निक क्लेग यांनी मंगळवारी येथे केली. उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार दरवर्षी देण्याची योजना आखण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या क्लेग यांनी मंगळवारी दुपारी दक्षिण मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली. उभय देशांमध्ये व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात संबंध सुधारण्याच्या दृष्टीने समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी क्लेग भारतीय दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी सोमवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट खूप सकारात्मक झाली आणि उभयपक्षी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात समन्वय करण्यासाठी पोषक वातावरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी ब्रिटनमधील विद्यपीठे उत्सुक असून याचा लाभ भारतीय विद्यार्थी घेऊ शकतात. दरवर्षी किती विद्यार्थी ब्रिटनला शिक्षणासाठी यावेत यासाठी कोणतीही मर्यादा नसल्याचेही क्लेग यांनी स्पष्ट केले. क्लेग यांच्यासोबत ब्रिटनमधील विविध विद्यापीठांचे आणि उद्योगसमूहांचे पदाधिकारीही दौऱ्यात सहभागी झाले आहेत. याचबरोबर भारतीय आणि ब्रिटिश महाविद्यालयांनी एकत्र येऊन समाज महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्तावही या दौऱ्यात ठेवण्यात आल्याची माहिती क्लेग यांनी दिली.
आपल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मंगळवारी सकाळी दादर येथील ‘मुक्तांगण’ या शाळेला आणि हिंदुजा रुग्णालयालाही भेट दिली. मुक्तांगण शाळेतील शैक्षणिक दर्जाचे तसेच हिंदुजा रुग्णालयात पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेचेही त्यांनी कौतुक केले.