कॅसेट किंग गुलशनकुमार यांच्या हत्ये प्रकरणातला फरार आरोपी अब्दुल रौफ याला बांग्लादेशमधून ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. गुलशनकुमार यांच्या हत्या प्रकरणात त्याला जन्मठेप झाल्यानंतर तो पॅरोलवर बाहेर येऊन फरार झाला होता. सध्या तो बांग्लादेश पोलिसांच्या ताब्यात आहे.
९० च्या दशकात टी सीरीजचे सर्वेसर्वा गुलशनकुमार यांनी संगीत क्षेत्रात आपले बस्तान बसवले होते. त्यामुळे अनेकांचा व्यवसाय धोक्यात आला होता. त्यामुळे प्रख्यात नदीम-श्रवण जोडीतील नदीम अख्तर सैफी याने गुलशनकुमार यांना मारण्याची सुपारी गँगस्टर अबू सालेमला दिली होती. १२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरी येथे गुलशनकुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी एकूण २५ जणांना अटक केली होती. मात्र त्यापूर्वीच नदीम इंग्लंडला पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. या हत्याकांडातील १७ दोषींना न्यायालयाने २००२ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यात अब्दुल रौफ दाऊद मर्चट याचा समावेश होता. मात्र १५ एप्रिल २००९ साली अब्दुल रौफ १४ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि तेव्हापासून तो फरार झाला होता. औरंगाबाद कारागृहातून पॅरोलवरून पळाल्यानंतर अब्दुल रौफ बांग्लादेशात निसटला होता. परंतु लगेचच  बनावट पारपत्र आणि बनावट नोटांच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्य़ात तो शिक्षा भोगत आहे. त्याच्या सुटकेचा कालावधी आता संपत आला आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अब्दुल रौफला ताब्यात घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे रौफ लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.