सकाळी न्याहारी आटोपली की हातात रंग आणि पाण्याने भरलेल्या पिशव्या घेऊन गावभर हिंडायचे किंवा एखाद्या चांगल्या पबमध्ये आयोजित केलेल्या होलिकोत्सवात सहभागी व्हायचे, हा मुंबईतील तरुण मंडळींचा धुळवडीच्या दिवशीचा दिनक्रम. पण यंदा मात्र धुळवडीचे रंग आणि क्रिकेटचे रन्स यांच्यात सामना रंगला आणि रन्सने बाजी मारली. तरुणाईने शुक्रवारी वर्ल्डकपनिमित्त रंगणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना बघण्याला पसंती दिली. यामुळेच शहरात होलिकोत्सव आयोजित केलेले पब्ज ग्राहकांची वाट पाहत राहिले आणि रस्तेही ओस पडलेले दिसले.
मुंबईतील जुहू चौपाटी, अंधेरी, दादर अशा विविध भागांत दिवसभर तरुणाईचा जल्लोष सुरू असतो. यंदा मात्र हा जल्लोष तुलनेत कमी जाणवला. क्रिकेटचा सामना असल्यामुळे सकाळी सोसायटीमध्येच धुळवड खेळून सामना सुरू होण्याच्या वेळेपर्यंत घरी पोहोचल्याचे सायन येथे राहणारा राकेश मोरे या तरुणाने सांगितले. तर बाहेर जाऊन धुळवड खेळताना कोणताही अनुचित प्रकार घडला आणि आमच्या मुलांना त्यातून कोणतीही इजा होऊ नये यासाठी यंदा प्रथमच आम्ही सोसायटीमध्ये धुळवड साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचे अंधेरी येथील एका सोसायटीचे सचिव दीपक भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले, असा निर्णय अनेक सोसायटय़ांनी घेतल्यामुळे तरुणाईने तेथेच धुळवड खेळणे पसंत केले. परिणामी रस्त्यांवर बाहेर पडणाऱ्यांची संख्या खूपच कमी दिसत होती. जुहू परिसरात धुळवडीसाठी आमंत्रण मिळेल म्हणून वाट पाहणाऱ्या ढोलपथकाला सकाळी ११ वाजेपर्यंत एकही काम न मिळाल्याने त्यांनीही निराशा व्यक्त केली. तर रस्त्यावरून जाताना अनेक ओळखीचे ग्रुप्स भेटतात. प्रत्येकाकडे कोणत्या प्रकारचे रंग असतात याची आपल्याला माहिती नसते. आमचा ग्रुप केवळ नैसर्गिक रंगांनीच होळी खेळतो, त्यामुळे ते सुरक्षित वाटत.े यामुळे या वर्षी एका मित्राच्या सोसायटीमध्येच धुळवड खेळण्याचा निर्णय घेतल्याचे विक्राळी येथे राहणारी अश्विनी तांबे सांगते.
राज्यातील पाणीसमस्या लक्षात घेता पाण्याचा कमीत कमी वापर करून कोरडी धुळवड खेळण्याचा संदेश परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातील विद्यार्थ्यांनी परिसरात दिला. तसेच शहरांतील इतरही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही नैसर्गिक रंगांनी धुळवड खेळा, कोरडी धुळवड खेळा, असे संदेश पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला असून ते राहत असलेल्या ठिकाणी याची अंमलबजावणी होईल याची काळजी घेतली.