इंधनावर चालणाऱ्या दुचाकीपेक्षाही दुचाकीला चालवत घोडदौड रंगवण्यात वेगळाच आनंद आहे. आधुनिकतेच्या हव्यासात आणि परदेशांच्या अनुकरणात आघाडीवर असणाऱ्या भारतीयांनी आयुष्यातून सायकल कधीचीच बाद केली आणि इंधनावर चालणाऱ्या दुचाकीवर ते स्वार झाले, पण पुन्हा सायकलींचा तो आनंद परतू पाहात आहे. एवढेच नव्हे, तर लांब पल्ल्यांच्या शर्यतीसुद्धा रंगायला लागल्या आहेत.
परदेशात इंधनावर चालणाऱ्या दुचाकी आल्या तरी त्यांनी आयुष्यातून सायकल कधीच बाद केली नाही. आजही दैनंदिन आयुष्यात सायकलींचा वापर ते नित्यनेमाने करतात. आता आधुनिकतेच्या नावाखाली या सायकलींकडे पाठ फिरवणाऱ्या भारतीयांनी आरोग्याकरिता का होईना, पुन्हा सायकलींना जवळ करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या उपराजधानीत सायकलींचे ग्रुप्स आता तयार व्हायला लागले असून एका ग्रुपने गेल्या डिसेंबरमध्ये तब्बल २०० किलोमीटरचे अंतर सायकलने पार पाडले. सुमारे ३१ सायकलस्वारांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आणि आता पुन्हा येत्या १२ एप्रिलला तशीच मोठी कामगिरी पार पाडण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. फ्रान्समध्ये लांब पल्ल्यांचे अंतर सायकलींनी गाठण्याला ‘ब्रेव्हे’ असे म्हणतात, नव्हे तो त्यांचा क्रीडाप्रकार आहे. हाच क्रीडाप्रकार आता अनेक देशांसह भारतीयांनी स्वीकारला असून नागपुरात दुसऱ्यांदा ही मोठी कामगिरी पार पडते आहे.
डिसेंबरमध्ये नागपूरकर सायकलपटूंनी २०० किलोमीटर एवढे लांब पल्ल्याचे अंतर कापले होते. येत्या १२ एप्रिललासुद्धा तेवढेच अंतर कापण्यासाठी पुन्हा  ते सज्ज झाले आहेत. झिरो माईलपासून सकाळी ५.३० ला शुभारंभ होणार असून झिल्पी, बोर धरणमार्गे सेलूपर्यंत जातील आणि पुन्हा तेथून लगेच परत येतील. आजमितीस सुमारे १० सायकलस्वारांनी त्यासाठी नोंदणी केली आहे, तर सुमारे २० सायकलस्वार या मोहिमेसाठी अपेक्षित आहेत, असे संयोजक अनिरुद्ध रईंच यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये वातावरणात गारवा असल्याने अपेक्षेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला, तर आता उन्हाने डोके वर काढल्यामुळे थोडा त्रास होणारच आहे. त्यामुळेच पहाटे ५.३० वाजता सायकलस्वारांच्या या मोहिमेला सुरुवात होणार आहे. डिसेंबरनंतर ऑगस्टमध्ये ही मोहीम सुरू होणार होती. मात्र, पहिल्या मोहिमेनंतर सायकलस्वारांना विश्वास मिळाला आणि त्यांच्या आग्रहाखातर एप्रिलमध्ये त्याचे आयोजन करावे लागले. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या मोहिमेकडे आता नागपुरकरांचेसुद्धा लक्ष लागले आहे.