दहावे आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाड नुकतेच पुण्यामध्ये बालेवाडी इथे संपन्न झाले. ३८ देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पध्रेमध्ये सहा विद्यार्थ्यांच्या भारतीय चमूने चार सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावत घवघवीत यश संपादित केले आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश असलेल्या या स्पध्रेत लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असतो.
हे ऑलिम्पियाड भारतामध्ये भरत असल्यामुळे भारताला नियमानुसार आणखी एक संघ या स्पध्रेमध्ये उतरवण्याची संधी मिळाली होती आणि भारताने या संधीचे अक्षरश: सोने केले.
कारण, या संघातील सहा विद्यार्थ्यांनी पाच सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची लयलूट केली. तपेईच्या चमूने सहा सुवर्ण पदके पटकावत या स्पध्रेत पहिला क्रमांक मिळवला आहे.
आहवान रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, बी. व्ही. एस. नायडू, बी. वम्सी, देवादित्य प्रामाणिक, दिव्यांश गर्ग, साई तेजा, मनन भाटिया, शुभम राणा या आपल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि चिन्मय तळेगावकर, प्रिय शाह व सी. एच. आर. हर्षवर्धन यांना रौप्य पदक मिळाले. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांच्या हस्ते स्पर्धकांना पदकांचे वितरण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या या भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. विनायक काटदरे, डॉ. जे. पुरोहित, डॉ. चित्रा कामत, प्रिया लागवणकर, जोहर अट्टारी आणि प्रा. पी. ए. साठे यांनी मोलाचे कार्य केले.