मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी मागदर्शक असलेल्या इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेतर्फे बुटीबोरी येथे उभारलेल्या वसाहतीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. घराचे पूर्णत्व प्रमाणपत्र नाही. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, अशा अवस्थेत गडकरी व फडणवीसांवर विश्वास टाकलेले हे कामगार राहात आहेत.
बुटीबोरी औद्योगिक परिसरात कामगारांसाठी वीर सावरकर नगर वसवण्यात आले आहे. इंडोरामा कामगार सहकारी गृह निर्माण संस्थेने येथील घरांचे बांधकाम केले आहे. कामगार घरात राहायला चार-पाच महिने होत नाही तोच त्यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. गेल्या पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात शिरले. घरातील सर्व भिंतीमध्ये सतत ओलावा राहतो आहे. या घरात कामगार पावसाळ्याच्या दिवसात कुटंबासह अक्षरश जीव मुठीत घेऊन जगतो. या वसाहतीमध्ये पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यात तर येथे पाण्याचे दुर्भिभ्य असते.
या नगरात सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थादेखील करण्यात आलेली नाही. यामुळे घाण आणि दरुगध परिसरात आहे.  येथील घरे नियमानुसार बांधण्यात न आल्याने एमआयडीसीकडून या घरांना ‘बिल्डिंग कम्पलीशन सर्टिफिकेट’ मिळालेले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १२८ घरांमध्ये राहणाऱ्या कामगारांना १८ रुपये प्रतियुनिटप्रमाणे पाण्याचे देयके प्राप्त होत आहेत.
 दुसऱ्या टप्प्यात घरांची नोंदणी करणाऱ्या कामगारांकडून बँक शुल्क, व्हॅट, सेवाकर आणि रजिस्ट्रीसाठी १ लाख ५७ हजार घेण्यात आले. यामुळे तेथील घर  कामगाराला ६ लाख ३७ हजार रुपयांत पडले आहे.
कामगारांचे उत्पन्न कमी असल्याने घर खेरदीसाठी त्यांना नागपूर नागरिक सहकारी बँकेकडून ३ लाख ८४ हजार कर्ज काढून देण्यात आले. यामुळे कामगारांना दर महिन्याला ५,५०० रुपयांचा  बँकेचा हप्ता भरावा लागत आहे. गृह निर्माण संस्थेने पाणी आणि वीज पुरवठय़ासाठी प्रत्येक कामगारांकडून २५ हजार रुपये घेतले. परंतु एमआयडीसीमध्ये ते भरण्यात आले नाही. कामगाराकडून रजिस्ट्रीकरिता रक्कम घेण्यात आली पण  केवळ काहींचीच रजिस्ट्री करण्यात आली. व्हॅट आणि सेवाकर कामगारांकडून संस्थेने घेतला. ती रक्कम सुद्धा संस्थेने संबंधित विभागाकडे जमा केलेली नाही.
बुटीबोरी औद्योगिक परिसरातील वीर सावगरनगरात पाणी, नाल्या, रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी  कामगारांवर शुल्क आकारण्यात आले. तरीदेखील या कामांसाठी खासदार प्रकाश जावडेकर व खासदार पीयूष गोयल यांच्या निधीतून ४० लाख रुपयांच्या कामाचे फलक वसाहतीत लावण्यात आले आहे.