स्त्रीच्या शब्दविहीन भावनांची बोलकी आत्मव्यथा ‘इंदूचे घर’ ही एकांकिका संजय भाकरे फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सिव्हिल लाईन्स स्थित चिटणवीस सेंटर येथे सादर करण्यात आली.
घरातील प्रत्येकाच्या अवकाशाचा पसारा सांभाळताना, घरातील महिलेची होणारी दगदग व त्यातून तिच्या मूक व्यथेला वाचा फोडणारी शब्दकथा म्हणून ‘इंदूचे घर’ या एकांकिकेकडे बघणे गरजेचे आहे. या एकांकिकेचे लेखन विक्रम भागवत यांचे असून दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी रमेश अंभईकर यांचे होते. नाटकातील मध्यवर्ती भूमिका मंजूषा देव यांनी साकारली, तर त्यांना मुकाभिनयाची साथसंगत अंजली रायटर, श्रेयस लाखे, कृणाल गोरले, धनश्री महाजन, आसावरी महाजन, आशीष डोंगरे, सुरेश चौहारे, अमित मेश्राम या नवोदित कलावंतांनी दिली. नाटकाला नेपथ्य व प्रकाशयोजना गणेश नायडू यांची होती, तर अमित आंबुलकर यांचे सहकार्य लाभले. संगीत केयूर भाकरे यांचे तर निर्मिती संजय भाकरे व कुणाल गडेकर यांची होती. तत्पूर्वी चिटणवीस सेंटरच्या वतीने संजय भाकरे, गणेश नायडू व रमेश अंभईकर यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र दुरुगकर उपस्थित होते.