बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. गेल्या काही दिवसांत गणपतीची मूर्ती घडविण्याच्या तयारीला वेग आला आहे. सणासुदीच्या दिवसात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. यावर्षी गणेशोत्सवावरही महागाई आणि व्यावसायिक मंदीचे संकट घोंघावत असल्याने मंडळांची चिंता वाढली आहे. सर्व पैलूंचा विचार करता मंडळांचे बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के वाढणार असल्याचा अंदाज आहे.
 गणेश मूर्तीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने जास्तीचा वाहतूक खर्चदेखील सहन करावा लागणार आहे. मूर्तीपुढे सजावट करणाऱ्या मंडळांना वस्तू महागल्याने बजेटमध्ये कपात करावी लागण्याची चिन्हे आहेत. शहरांमध्ये गणेश उत्सवाच्या तयारीला वेग आला असून चितार ओळीत गणपतीच्या मूर्तीचे जवळजवळ ६० टक्के काम झाले आहे. तर काही मूर्तीना रंग देण्याचे कामही सुरू झाले आहे. छोटय़ा ४ ते ५ इंचाच्या मूर्तीपासून तर २५ फूट उंच मूर्ती पाहायला मिळत आहेत. काही मूर्तीकारांचे गणपती प्राथमिक अवस्थेत आहेत तर, काहींकडे मूर्तीना रंगवण्याचे कामही सुरू आहे. प्रत्येक मूर्तीकाराकडे किमान ३० ते ४० मूर्ती बनत आहेत. महागाई वाढल्याने मूर्तीच्या किमतीही २ ते ३ हजारांनी वाढल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाला आहे. शहरात चितारओळ आणि लालगंज भागात मूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू झाली असून दिवस-रात्र काम करीत आहे. खरेदीसाठी लोकांची गर्दी सुरू झालेली नसली तरी मूर्ती कशा तयार होतात हे बघण्याची उत्सुकता असलेल्या काही लोकांची तुरळक गर्दी बघायला मिळत आहे. पोळ्यानंतर गर्दी वाढेल, असा अंदाज मूर्तीकार बांधत आहेत. चितारओळीत आता लगबग जाणवत असली तरी मूर्तीकारांचे खरे काम आठ महिने आधीपासूनच सुरू होते.
गेल्या अनेक वर्षांंपासून चितार ओळीत मूर्ती घडविण्याचे काम करणारे ज्येष्ठ मूर्तीकार प्रमोद सुर्यवंशी यांनी सांगितले, उत्सवाच्या आठ महिने आधीपासूनच तणस, माती, पोते, लाकूड असे सामान जमवण्याचे काम सुरू होते. मूर्तीवर डिझाइन करण्याची माती वेगळी वापरली जाते. त्यानंतर मग हळूहळू कामाला सुरुवात होते. भसोली ही माती घेऊन त्यात डिंक, कापूस टाकून मिश्रण तयार केले जाते. मोठय़ा मूर्तींसाठी सुरवातीलाच तणस बांधून बेस दिला जातो, त्यानंतर त्याला अनुक्रमे माती लावून पोत्यांनी गुडांळले जाते. माती सुकल्यावर व्हाईटिंग करून रंग दिला जातो. मूर्ती वाळाव्याकाही वेळा उन्ह नसेल तर मशीनने सुकविल्या जातात.
या वर्षी तणस, लाकूड आणि रंगाच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. जी मूर्ती गेल्यावर्षी ५ ते ६ हजाराला होती ती यावर्षी ८ हजार रुपयांना विक्रीला आहे. माती भंडारा जिल्ह्य़ातील आंधळगाव येथून आणली जाते. साधरणत: एक गाडी माती ८ ते १० हजार रुपयाला मिळते. त्यात सात ते आठ पोती माती असते. गणपतीची मूर्ती घडविण्यामध्ये मेहनत खूप असल्याने आता नवीन मुले हे काम करायला येत नाहीत. इतका वेळ खर्च करण्याची मुलांची तयारी नाही. त्यामुळे नवीन लोकांचा ओढा या कामात अतिशय कमी आहे. गणपतीबरोबरच गौरीची मूर्ती तयार करण्याचे कामही सुरू आहे. काही ठिकाणी गौरीचे मुखवटे तयार करण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे मूर्तीकारांचे संपूर्ण कुटुंबच या कामी आता मदत करीत आहे. सध्या नागपुरात गणपती फिवर जाणवतो आहे!