गणेशोत्सव काही दिवसांच्या अंतरावर आला आहे. हा उत्सव साजरा करण्याची जिकडे तिकडे जोरदार तयारी सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या विघ्नहर्ताच्या उत्सवावर  महागाईचे विघ्न आले आहे. रंगाच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा फटका श्री गणेमूर्तीना बसला असून मूर्तीच्या किमतीत ३० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
उरण तालुक्यात श्री गणेश मूर्ती तयार करण्याचे पारंपरिक प्रसिद्ध कारखाने आहेत. तालुक्यात चिरनेर, बोकडविरा, मुळेखंड, सोनारी, गोवठणे, चिर्ले आदी गावात जवळपास पंधरा ते वीस श्री गणेश मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. सर्वात अधिक कारखाने चिरनेर या गावात आहेत. येथील कारखान्यात काम करणारे अनेक कारागीर सध्या जागतिक पातळीवर गणपती मूर्तीसाठी नावाजलेल्या पेण तालुक्यातील मूर्ती घडविण्यात अग्रेसर आहेत.
चिरनेर येथील मूर्तिकार शाडूच्या मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहेत. तर बोकडविरा येथील बाबूराव विठ्ठल, काशिनाथ व शंकर विठ्ठल पाटील यांच्या कारखान्याला पाच पिढय़ांचा वारसा आहे. सुबक व उच्च प्रतीच्या मूर्ती त्याचप्रमाणे खास करून नैसर्गिक रंगासाठी हा कारखाना प्रसिद्ध असून कोणत्याही मजुराची मदत न घेता घरातीलच मंडळी परंपरा म्हणून या कारखान्यात काम करीत असल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली आहे. कारखान्यात जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्याच श्री गणेश मूर्ती तयार केल्या जातात.  सध्या अनेकांकडून प्लास्टरच्या मूर्तीचीही मागणी होऊ लागली आहे. असे असले तरी महागाईला न जुमानता आम्ही शाडूचीच माती वापरून मूर्ती तयार करतो. गेल्या अनेक वर्षांतील शाडूची माती आणि रंगांच्या दरवाढीमुळे व्यवसायातील नफा घटला आहे. ३० किलो शाडूची माती गेल्या वर्षी १६० रुपयांना मिळत होती ती या वर्षी २०० रुपयांना मिळत आहे. तर  १०० ग्राम रंगाची किंमत १४० वरुन १८० रुपये झाली असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.  नैसर्गिक रंगाच्या किमती वाढल्याने गणपतीच्या किमतीतही तीस टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. केवळ पेणमधून तयार गणपती आणायचे व बाजारात विकायचे प्रमाण वाढल्याने पारंपरिक कारखान्यांकडील मूर्तीची मागणीही घटली आहे, असे मूर्तीकडांकडून सांगण्यात येते.  मोल्ड वापरून तयार करण्यात येणारे प्लास्टरचे गणपती पेक्षा हाताचा वापर करून तयार करण्यात आलेल्या शाडूच्या मूर्तीत खऱ्या कलाकाराचा कस लागतो. हा व्यवसाय केवळ नफ्यासाठी नसून कलेची उपासना करण्यासाठी करीत असल्याची भावना मूर्तिकार सुहास पाटील यांनी व्यक्त केली आहे.  सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्याही किमतीतही वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दोन फुटांची एक हजार रुपये असलेली मूर्तीची किंमत १५०० ते १८०० रुपये, तर तीन फुटांच्या मूर्तीची किंमत २५०० रुपये झाली असल्याची माहिती दिलीप पाटील यांनी दिली आहे.