उन्हाच्या तीव्रतेने एकीकडे नाशिककर भाजले जात असताना दुसरीकडे महागाईच्या चटक्यामुळे त्यांची अधिकच होरपळ होत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात ही होरपळ अधिकच वाढली असून भाजीपाल्यांनी दराची साठी ओलांडली असून पुढील महिन्यात काही भाज्या शंभरी गाठण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्राहकांची मागणी जास्त असली तरी आवक कमी असल्यामुळे भाज्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
मागील वर्षांच्या ऑक्टोबरपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फेरा या वर्षांतही सुरू राहिल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम पिकांप्रमाणेच भाजीपाल्यावरही झाला आहे. मध्यंतरी सलग काही दिवस अवकाळी पाऊस कोसळल्याने भाजीपाल्याचे शेतातच नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत भाजीपाल्याची काढणी सुरू केल्याने बाजार समितीत अचानक भाजीपाला आवकमध्ये वाढ होऊन त्याचा परिणाम भाव कोसळण्यात झाला. मुबलक प्रमाणात आवक झाल्याने भाज्यांचे दर २० ते ३० रुपये किलोपर्यंत खाली आले.
काही दिवस ही स्थिती जैसे थे राहिली. उन्हाच्या तीव्रतेत वाढ होऊ लागल्यावर भाजीपाल्यांच्या दराची परिस्थिती बदलली. वाढणारे तापमान आणि ग्रामीण भागाला बसणारे टंचाईचे चटके यामुळे पिकांना पाणी देण्याची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली. वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांसह भाजीपाल्याचेही नुकसान होऊ लागले. परिणामत: ग्रामीण भागातून नाशिकमध्ये होणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली. लग्नसराई आणि उन्हाळ्याची सुटी यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली असताना तुलनेत पुरवठा कमी होत गेल्याने अनेक भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली असून कित्येक भाज्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपयाने मिळत असल्याने गृहिणींपुढे दररोज कोणती भाजी करावी, हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
भाजीपाल्याच्या या महागाईवर काही गृहिणींनी आपल्या सोयीनुसार तोडगा काढला असून जी भाजी स्वस्त असेल ती घेण्यावर भर दिला आहे. बटाटा हा सर्वाधिक स्वस्त म्हणजे १० रुपयांत दोन किलो किंवा काही ठिकाणी यापेक्षाही स्वस्त आहे. त्यामुळे बटाटा खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. बाजारात ओले मटार सर्वात महाग म्हणजे १००-१२० रुपये किलोने उपलब्ध आहेत. शहरातील इतर भाजीपाल्यांचे किरकोळ बाजारातील दर पुढीलप्रमाणे- कांदा (१५ रु. किलो), टोमॅटा (३०), लसूण (७०-८०), काकडी (२०), आले (८०), मिरची (६०-९०), भोपळा (१० रु. नग), बीट (५ रु. नग), गिलके (६०), दोडके (६०), कारले (६०), ढेमसे (४०), भेंडी (४०), भरताचे वांगे (४०), वांगे (४०), डांगर (४०), तोंडली (४०), गवार (४०),पत्ता कोबी (१० रु. नग), फुल कोबी (६०-८०), वाल (६०), कोंथिबीर (४० रु. जुडी) याप्रमाणे आहेत.
भाज्यांचे दर ऐकल्यावर बहुतेक जण खरेदी न करताच निघून जात असल्याची व्यथा भाजी विक्रेते संजय कर्पे यांनी मांडली. उन्हाची वाढती तीव्रता पाहता मे महिन्यात भाजीपाल्याच्या दरात अधिक वाढ होईल. जूनच्या पहिल्या आठवडय़ात किंवा पाऊस नियमित सुरू होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.