राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ठाण्यातील नौपाडा परिसरात दोन लाख रुपयांच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटास ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेने सोमवारी रात्री गजाआड केले असून त्यामध्ये एका दाम्पत्याचा समावेश आहे. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या पैशांमध्ये या बनावट नोटांचा वापर होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
मुबारक इम्तियाज शेख (३०) आणि मर्जिना मुबारक शेख (२७), असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे तर बिसरू ऊर्फ बिसरदी जारदीश शेख (४२, रा. रे रोड, मुंबई), असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. कळवा येथील भास्करनगर परिसरात शेख दाम्पत्य राहात असून ते मूळचे झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्य़ातील रहिवासी आहेत. ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने मिळालेल्या महितीच्या आधारे या तिघांना नौपाडा परिसरातून अटक केली.
या त्रिकुटाकडून दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, १८ फेब्रुवारी २०१२ मध्ये नवी मुंबई पोलिसांनी शेख दाम्पत्याला बनावट नोटांच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये जप्त करण्यात आले होते. महिनाभरापूर्वीच शेख दाम्पत्य जामिनावर बाहेर आले असून त्यांनी बनावट नोटा विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे.
हुबेहूब नोटा..
या त्रिकुटाकडे सापडलेल्या बनावट नोटा आणि खऱ्या नोटांमध्ये बरेचसे साम्य असल्याने सर्वसामान्य नागरिकांची सहज फसवणूक होऊ शकते. खऱ्या नोटा ओळखण्याच्या हुबेहूब खुणाही या खोटय़ा नोटांमध्ये असून त्या अतिशय तंतोतंत आहेत. या नोटा नाशिकमधील सुरक्षा प्रिंटिंग प्रेसमध्येच छापण्यात आल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याचा सविस्तर तपास करण्यासाठी भारतीय रिझव्‍‌र्ह बँक आणि नाशिकमधील सुरक्षा प्रिंटिंग प्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. तसेच विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वाटण्यात येणाऱ्या पैशांमध्ये या बनावट नोटा वापरण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दिशेनेही तपास करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शस्त्रे जप्त..
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विशेष मोहिमेंतर्गत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वेगवेगळ्या युनिटने १३ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन रिव्हॉल्व्हर, सात पिस्तुले, सात गावठी कट्टे आणि ३५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.