पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मागील आठवडय़ात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आल्यावर अतिक्रमणधारकांनी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण केल्याने पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकास पुन्हा एकदा मोहीम राबवावी लागली.
मागील सप्ताहात बुधवारी मोहीम राबविण्यात आल्यानंतर आठवडय़ानंतर पुन्हा बुधवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली गेली. मोहीम राबविताना भेदभाव करण्यात येत असल्याचा आक्षेप काही व्यावसायिकांनी घेतला. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालिकेच्या पथकाने कार्यवाहीस सुरुवात केली. रस्त्यात वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण दूर करण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले. प्रत्यक्षात पालिकेचे पथक कारवाई करून पुढे जात नाही तोच पुन्हा आहे त्या जागेवर लहान विक्रेते दुकाने थाटत असल्याचे दिसून आले. अशा प्रकारची मोहीम दररोज का राबविण्यात येत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात
आला आहे.
अनेक दिवसांपासून रस्त्याला अडथळे ठरत असलेले अतिक्रमण दूर करण्यासाठी सुरुवातीला आठवडय़ातून एकदा याप्रमाणे मोहीम राबविणार असलो तरी त्यातून विक्रेत्यांना शिस्त लागेल, असा आशावाद मुख्याधिकारी निर्मल गायकवाड यांनी व्यक्त केला. यापुढे सातत्य ठेवताना दररोज अशा प्रकारची मोहीम राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पंधरवाडय़ात विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही गायकवाड यांनी नमूद केले.