दिंडोरी रस्त्यावरील म्हसोबा वाडीतील अतिक्रमणे हटविताना संतप्त जमावाने पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक करत लाठय़ाही उगारल्याने या मोहिमेला हिंसक वळण लागले. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर टेकडीवर वसलेल्या वाडीतील जवळपास १५० कच्ची घरे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे संतापलेल्या अतिक्रमणधारकांनी पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन तीन तास ठिय्या दिला. पोलीस व पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यानच्या काळात पालिका, पोलीस व अतिक्रमणधारकांचे नेते यांच्यात चर्चा झाली. म्हसोबा वाडीत पुन्हा आपली घरे वसविण्याचा निर्धार करीत अतिक्रमणधारक मार्गस्थ झाले तर उपरोक्त जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले असून संबंधितांना तिथे पुन्हा वसण्याची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. बंदोबस्त पुरविणे आपले काम असून उपरोक्त जागेवर पुन्हा अतिक्रमण झाल्यास त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे.
17

प्रदीर्घ काळापासून गाढ झोपेत असणारा अतिक्रमण निर्मूलन विभाग सिंहस्थ कामांच्या निमित्ताने जागा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या विभागाने तपोवन परिसरातील १००हून अधिक अनधिकृत घरे भुईसपाट केली होती. साधुग्रामच्या जागेतील अतिक्रमण हटविताना पथकाला स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. ही घटना ताजी असताना म्हसरुळ गावालगतच्या म्हसोबा वाडीतील अनधिकृत घरे हटविताना पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. महापालिकेची सव्‍‌र्हे क्रमांक २५७ व २५९ मध्ये २५ एकर जागा आहे. टेकडीवजा जागेवर काही दिवसांपासून अनधिकृतपणे कच्च्या स्वरूपात घरे उभारण्याचे काम सुरू होते. त्याची माहिती मिळाल्यावर अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी सकाळी आठ वाजता या भागात पोलीस बंदोबस्तासह धडक मारली. काही वेळातच त्याची माहिती पसरल्याने अतिक्रमणधारक जमा होऊ लागले. पोलिसांनी सर्वाना समज देत अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले. काही घरे जमीनदोस्त होईपर्यंत मोहीम शांततेत सुरू होती. परंतु, एक घर हटविण्यास महिलांनी विरोध केला. पालिका महिला कर्मचारी व पोलिसांवर लाठय़ा उगारण्यात आल्या. या वेळी जमावातील एका गटाकडून अचानक दगडफेक सुरू झाली आणि प्रचंड गदारोळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बळाचा वापर करून दगडफेक करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले. प्रखरपणे विरोध करणाऱ्यांना बाजूला हटवत मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतल्यावर पालिका पथकाने घरे हटविण्याचे काम सुरू केले. दुपारी १२ वाजेपर्यंत म्हसोबा वाडीतील जवळपास १५० घरे उद्ध्वस्त करण्यात आली.
घरे भुईसपाट झाली बघितल्यावर अतिक्रमणधारक संतप्त झाले. २०० ते ३०० जणांनी पंचवटी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत पालिका व पोलिसांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यानच्या काळात भटक्या-विमुक्तांचे नेते जी. जी. चव्हाण हेदेखील पोलीस ठाण्यात पोहोचले. आम्हाला राहण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी अतिक्रमणधारकांची मागणी होती. या मुद्दय़ावर चव्हाण व इतर नेत्यांनी पोलीस ठाण्यातच पोलीस व पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा सुरू असताना बाहेर अतिक्रमणधारकांचा गोंधळ सुरू होता. अखेरीस चर्चा झाल्यावर चव्हाण यांनी अतिक्रमणधारकांना परत म्हसोबा वाडीत जाऊन वसण्याचे आवाहन केले. म्हसोबा वाडीत आपण जिथे वसलो, तिथे पुन्हा वसण्याची परवानगी पालिका अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. दगडफेक करणारे वा लाठी उगारणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने गुन्हा दाखल केला नाही. आहे त्या जागेवर वसण्यास चव्हाण यांनी सांगितल्यावर अतिक्रमणधारकांचा रोष काहीसा कमी झाला आणि त्यांनी पुन्हा त्या जागेकडे कूच केले. तथापि, या घडामोडीबाबत पालिकेने कानावर हात ठेवले. अतिक्रमणधारकांना पुन्हा त्याच जागेवर वसण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. शुक्रवारी अतिक्रमणधारकांचे शिष्टमंडळ पालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे. अतिक्रमणधारकांनी पुन्हा आहे त्या जागेवर वसण्याचा निर्धार केल्याबद्दल पोलीस यंत्रणेने तो आपला प्रश्न नसल्याचे म्हटले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी बंदोबस्त पुरविणे पोलीस यंत्रणेचे काम आहे. पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण झाल्यास पोलीस यंत्रणा काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला.

अनधिकृत घरे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने उद्ध्वस्त केली. या वेळी स्थानिकांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या एका गटाने दगडफेकही केली. यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. घरे भुईसपाट होऊ लागल्यावर अतिक्रमणधारकांनी संसारोपयोगी साहित्य वाचविण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे संतप्त अतिक्रमणधारकांनी नंतर पंचवटी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. या वेळी पालिका व पोलिसांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी म्हसरुळ गावातही पक्क्या स्वरूपाची काही अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली.

लाठीमाराच्या छायाचित्रांची दडपादडपी ?
म्हसोबा वाडीतील अतिक्रमणे हटविण्यास स्थानिकांनी विरोध केला. यावेळी पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनाक्रमाचे छायाचित्र टिपणाऱ्या छायाचित्रकारांना पोलीस व पालिका अधिकाऱ्यांकडून लाठीमाराची छायाचित्रे काढून टाकण्यास सांगण्यात आले. काहींच्या कॅमेऱ्यातील छायाचित्रे तर स्वत:समोर ‘डिलीट’ करवून घेतली, असे उपस्थितांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे अतिक्रमण निर्मूलन ही गुप्त कारवाई असल्याचे पालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेची छायाचित्रे प्रसारमाध्यमांना दिली जातील की नाही याबद्दल त्यांना फारसे काही सांगता आले नाही. एकूणच अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला मिळालेले हिंसक वळण, पोलीस यंत्रणेने केलेला बळाचा वापर, त्यानंतर डिलीट केली गेलेली छायाचित्रे आणि पालिका जनसंपर्क विभागाची भूमिका यामुळे दडपादडपीबद्दल चर्चा सुरू होती.

पालिकेने कोणतेही आश्वासन दिलेले नाही
म्हसोबा वाडीतील अतिक्रमण हटविल्यानंतर अतिक्रमणधारकांना पुन्हा त्या जागेवर वसण्याबाबत पालिकेने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. म्हसरुळलगतच्या म्हसोबा वाडीत महापालिकेची २५ एकर जागा आहे. या ठिकाणी अतिक्रमणे होत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी पालिकेने उपरोक्त भागातील सर्व अनधिकृत बांधकामे हटविली आहेत. अतिक्रमणधारकांचे शिष्टमंडळ शुक्रवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
आर. एम. बहिरम
(उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग)