दिवाळी हा प्रकाशाचा सण, अंधारावर मात करून सकारात्मक वृत्तीने वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा सण. वर्सोव्यातील कल्पस्वी राणे हिच्याबाबतीतही दिवाळी ही अशाचप्रकारे जगणे उजळवून टाकणारी ठरली आहे. आपल्यातील मानसिक अपंगत्वावर मात करीत कल्पस्वीने अत्यंत आकर्षक व सुबक पद्धतीने पणत्या रंगवून अशा गतिमंद मुलांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर वेगळी वाट प्रकाशमान केली आहे. तिने रंगविलेल्या पणत्या एवढय़ा आकर्षक आहेत की त्यांना अगदी अटकेपार म्हणजे मॉरिशसहूनदेखील मागणी आहे.
कल्पस्वी ही डाउन्स सिंड्रोम या जनुकदोषामुळे निर्माण होणाऱ्या विकाराची रुग्ण आहे. पण आपल्या या रोगावर मात करून लहानपणापासून रंगकामाची, िभती रंगवण्याची तिला आवड आहे. तिच्या कलेला आणि जिद्दीला तिची आई नीना यांनी प्रोत्साहन दिले. आजची कल्पस्वी घडविण्यामागे तिच्या आईचाच वाटा मोलाचा आहे. त्यामुळेच कल्पस्वीला पणत्या रंगविताना निर्मळ आनंद तर मिळतोच, पण पणत्यांच्या विक्रीतून तिचे अर्थार्जनही होते. मात्र पशांच्या तुलनेत पणत्या रंगवण्यातून तिला जो आनंद मिळतो, तिच्या कलेचे कौतुक सर्वत्र केले जाते तेच आमच्यासाठी मोलाचे असल्याची प्रतिक्रिया तिची आई नीना यांनी व्यक्त केली.
कल्पस्वीला पहिल्यापासून चित्रकलेची आवड आहे. ती अतिउत्साही असल्यामुळे सुरुवातीला भिंत हीच तिचा कॅनव्हास होती. त्यामुळे तिचे रंगकाम घरच्यांना त्रासदायक वाटायचे. परंतु तिची आवड लक्षात घेऊन नंतर त्यांनी तिला प्रोत्साहन देण्याचे ठरवले. त्यादृष्टीने तिला रंगवण्याची पुस्तके, मातीची मडकी, रंगवण्याचे साहित्य आणून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आधीच रंगकामाची आवड असलेल्या कल्पस्वीचा छंद बहरला आणि त्यातूनच व्यवसायाची सुरुवात झाली, असे तिची आई आवर्जून सांगते.
नीना या सेन्ट्रल बँकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कल्पस्वीला त्या अधून-मधून त्यांच्यासोबतकार्यालयात नेत असत. त्यामुळे तिच्या छंदाची माहिती कार्यालयातील इतरांना झाली आणि तिला व तिच्या कलेला प्रोत्साहन म्हणून नीना यांच्या अन्य सहकाऱ्यांनी कल्पस्वीने रंगविलेल्या पणत्या विकत घेण्यास सुरुवात केली. दादर येथील महाराष्ट्र चेंबर्स अ‍ॅण्ड कॉमर्सच्या व्यापार पेठ प्रदर्शनात कल्पस्वीला ‘बेस्ट प्रॉडक्ट-बेस्ट स्टॉल’चे पारितोषिक मिळाले होते. तो क्षण आपल्या जीवनातील अतुलनीय क्षण असल्याचेही नीना यांनी सांगितले.