सोलापूर जिल्ह्य़ातील यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल समूहाने उत्तर सोलापूर तालुक्यापाठोपाठ दक्षिण सोलापूर तालुक्यातही शिरपूर पॅर्टनच्या धर्तीवर लोकमंगल बंधारे उभारून जलसंधारणाची चळवळ सशक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज,बीबी दारफळ, अकोले काटी, सावळेश्वर आदी १५ किलोमीटर अंतराच्या ओढय़ाचे सरळीकरण व रूंदीकरण करून त्याठिकाणी १२ सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. लोकसहभागातून सुमारे दहा कोटी खर्चाच्या या कामामुळे परिसरातील शेतजमिनींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. याठिकाणी सुमारे ७५० कोटी लिटर पाण्याची उपलब्धता होईल,अशी अपेक्षा आहे. या योजनेचा औपचारिक शुभारंभ गेल्या ३ मे रोजी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता. लोकमंगल समूहाचे अध्वर्यू तथा भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांच्या डोळस नेतृत्वातून हा उपक्रम उत्तर सोलापूर तालुक्यापाठोपाठ दक्षिण सोलापूर तालुक्यातही उभारण्यात येत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यात बीबी दारफळ व दक्षिण सोलापूर तालुक्यात भंडारकवठे अशा दोन ठिकाणी लोकमंगल साखर कारखाना कार्यरत आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारणाची चळवळ उभी राहण्यासाठी लोकमंगल समूहाने यशस्वी प्रयत्न चालविले आहेत. दक्षिण सोलापुरात निंबर्गी ते भंडारकवठेपर्यंत नऊ किलोमीटर अंतरापर्यंतच्या दोन ओढय़ांचे सरळीकरण तथा रुंदीकरण आणि सिमेंट बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ४६५ कोटी लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रास होऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाची पहाट उगवणार आहे. या भागाला यापुढे दुष्काळाशी सामना करावा लागणार नाही, असा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.