मुंबई येथे शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात येथील कलाकारांनी बनविलेला ‘इनोसन्स’ हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. महोत्सवात ९४ भारतीय, तर ५५ लघुपट हे जगभरातील, असे एकूण १४९ लघुपट दाखविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये अमेरिका, तुर्की, ब्रिटन, जर्मनी, ब्राझील, फ्रांस, रोमानिया, मेक्सिको, क्रोशिया व इतर काही खंडांतील देशांचा समावेश आहे.
महोत्सवासाठी ७०० च्या आसपास लघुपट पाठविण्यात आले होते. मात्र त्यातील १४९ लघुपटांची निवड करण्यात आली. सर्व लघुपटांचे माहितीपट, अ‍ॅनिमेशन व संगीत लघुपट असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात नाशिकचे नवोदित दिग्दर्शक हर्षल भुजबळ यांनी इनोसन्स हा लघुपट दिग्दर्शित केला असून निसर्गावर माणसाने केलेल्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. लघुपट मानवी प्रवृत्ती, निसर्गावरील अतिक्रमणाचा बसणारा फटका याबाबत अंतर्मुख होत विचार करायला लावणारा आहे. याबाबत निसर्गप्रेमी वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होतात. मात्र हे आंदोलनकर्ते वातानुकूलित वातावरणात राहतात. या यंत्राच्या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोन थराला होणारे नुकसान याचा अंदाज कोणाला नाही. वृक्षसंवर्धन आदी मुद्दय़ांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आता निसर्गाने त्याचे वेगळे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. म्हणून माणसाने विचार करण्याची गरज आहे, ही संकल्पना पुष्कराज जोशी यांनी मांडली. हर्षल यांनी या संकल्पनेला लघुपटाचे मूर्त रूप दिले. प्रसाद रहाणे यांचे कलादिग्दर्शन असून प्रवीण ठाकरे यांनी छायाचित्रण केले आहे. लघुपटात १० वर्षांच्या आदित्य, रत्नाकर आणि दीप्ती बोन्दार्डे या नवोदितांनी भूमिका साकारल्या आहेत. निसर्गसंवर्धन विषय वेगळ्या धाटणीने मांडायचा हा प्रयत्न आहे. पहिल्याच प्रयत्नातील लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात धडकला आहे.