पैशाच्या निकडीमुळे अनेकांची सदसद्विवेकबुद्धी गहाण पडते. पूर्वी ठाण्यात आणि आता पालघर जिल्ह्य़ात असलेल्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावात राहणाऱ्या जयसिंग कडू या तरुणाच्या बाबतीत असेच घडले. दोन वर्षे त्याला कारागृहाची हवा खायला लागलीच, शिवाय त्यात त्याचे ठरलेले लग्नही मोडले. एका नव्या आयुष्याचे स्वप्न फुलण्याआधीच भंगले.
ठाणे जिल्ह्य़ातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावात जयसिंग कडू राहतो. आई-वडील, दोन मोठे भाऊ असे त्याचे कुटुंब. आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची. आई-वडील आणि मोठी भावंडे शेतामध्ये मोलमजुरीचे काम करतात. या पैशातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. जयसिंगला चार चाकी वाहन चालविता येते. पण, कायमस्वरूपी कामाला नाही. त्यामुळे मिळेल तिथे तो बदली वाहनचालक म्हणून काम करतो. डिसेंबर २०१० मध्ये त्याचे लग्न ठरले आणि साखरपुडाही झाला. पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याचा विवाह होणार होता. त्यामुळे त्याच्यापुढे लग्नाच्या खर्चाचा प्रश्न होता. एके दिवशी गावातील प्रवीण पाडेकर या मित्राने त्याच्यासाठी बदली चालकाचे काम आणले. पार्टीला वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जम्मूला  घेऊन जायचे आहे, असे त्याला सांगण्यात आले होते. या कामाचे त्याला सात हजार रुपये रोख मिळणार होते. गरजवंत असल्याने तो पटकन तयार झाला. वाहन चालविण्याचे काम मिळाले असून दोन-तीन दिवसांत परत येतो, असे सांगून तो घराबाहेर पडला. पण, दोन दिवस उलटूनही तो घरी परतलाच नाही. सर्वत्र शोधाशोध झाली त्याचा कुठेच थांगपत्ता लागेना. अखेर कुटुंबीयांनी मोखाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंद केली आणि खऱ्या अर्थाने तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी त्याचा मित्र प्रवीण पाडेकर, त्यांना जम्मू येथे नेणाऱ्या अशोक भूषण डोंगरे आणि अल्ताफ शेख आदींची चौकशी केली. या चौकशीत राजस्थान-दिल्ली या राज्यांच्या सीमेवर पोलिसांनी गांजा तस्करीच्या आरोपाखाली जयसिंगला अटक केली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे जयसिंगचा शोध लागला खरा पण, त्याच्या सुटकेचा नवा पेच कुटुंबापुढे उभा राहिला.
न्यायालयीन कामासाठी दिल्लीला जाण्यासाठी त्याच्याकडे फारसे पैसेही नव्हते. सर्वत्र धडपड करूनही त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते आणि सुटकेचा मार्गही सापडत नव्हता. अखेर गावातील एका व्यक्तीच्या ओळखीने ते कुटुंब वकील रवी थोरात यांना भेटले आणि खऱ्या अर्थाने जयसिंगच्या सुटकेची लढाई सुरू झाली. पटियाला हाउसमधील येथील स्पेशल न्यायालयात जयसिंगचा खटला सुरू होता. अ‍ॅड. संजीवकुमार आणि अ‍ॅड. रवी थोरात यांनी त्याची बाजू भक्कमपणे मांडली आणि त्याची या प्रकरणातून सुटका केली. मात्र, या सर्व प्रक्रियेत तब्बल दोन वर्षांचा काळ लोटला आणि तोपर्यंत त्याला कारागृहातच खितपत पडावे लागले. विशेष म्हणजे १४ लाख रुपये देऊन दिल्ली पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतल्याची कबुली अशोक डोंगरे याने मोखाडा पोलिसांना जबाबात दिली. याशिवाय, यापूर्वी तीनदा जम्मू येथून गांजा आणल्याची कबुली दिली आहे. असे असतानाही मोखाडा पोलिसांनी त्या जबानीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळेच दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणारा अशोक आजही मुक्तपणे संचार करीत आहे. मात्र, त्याच्यामुळे जयसिंग कडूसारख्या निष्पाप तरुणाला तुरुंगवास भोगावा लागला.
नीलेश पानमंद, ठाणे