सांगली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात ४० लाखांचा अपहार उघडकीस आल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील ६७ वसतिगृहांची झाडाझडती घेण्यात आली. अपहार करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांवर अंतर्गत लेखापरीक्षणानंतर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. अपहारातील २० लाखांचा धनादेश वित्त विभागाने रोखल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला असून अधीक्षक प्रशांत हर्षद आणि कनिष्ठ सहायक एस. एस. गोसावी यांना काल निलंबित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत शासकीय अनुदान वाटप करण्यात येते. या विभागाअंतर्गत शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी चा परतावा करण्यात येतो. गेल्या सप्ताहात या विभागाकडून २० लाखांचा धनादेश कुपवाड येथील वसंत विद्यार्थी वसतिगृहाच्या नावे काढण्यात आला होता. त्यावेळी संशय आल्याने हा धनादेश वित्त विभागाने रोखून धरला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन कार्यालयातील कपाटे सील केली. चौकशी समितीमार्फत चौकशी केली असता या पूर्वी २० लाख रुपये खर्ची टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
समाजकल्याण विभागातून धनादेशाव्दारे शैक्षणिक संस्थेच्या नावे रक्कम द्यायची आणि पुन्हा चूकभूल झाली म्हणून दिलेले अनुदान परत मागायचे. मात्र हे अनुदान परत घेत असताना वैयक्तिक नावाने धनादेश घ्यायचा अशी अपहाराची पद्धत या विभागात अधीक्षक प्रशांत हर्षद व एस. एस. गोसावी यांनी अवलंबिली होती. अपहार करण्यात आलेली सर्व रक्कम जमा करण्यात आली असून या दोघांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनानंतर या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत असून समाजकल्याण विभागाचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्यात येत आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त होताच शासकीय रकमेचा अपहार केल्याच्या कारणावरून या दोघांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. नारनवरे यांनी सांगितले.
दरम्यान समाजकल्याण विभागामार्फत अनुदान देण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील ६७ वसतिगृहांची मंगळवारी विशेष पथकांव्दारे    झाडाझडती घेण्यात आली. वसतिगृहातील दप्तर तपासणीबरोबरच उपस्थित विद्यार्थी मिळणारे अनुदान आणि त्याचा विनियोग याबाबत पथकाने वसतिगृहाच्या अधिष्ठातांकडे चौकशी केली. या चौकशीचा अहवाल दिवाळीपूर्वी वरिष्ठांना सादर  होण्याची शक्यता आहे.
समाजकल्याण विभागातील गरव्यवहाराला अधिकारी वर्गच कारणीभूत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी समाजकल्याण सभापती श्रीमती छायाताई खरमाटे यांनी मंगळवारी पत्रकार बठकीत केली.