जिल्हय़ात तीव्र पाणीटंचाईमुळे उपाययोजना करण्याविषयी जिल्हा प्रशासनाने १० कोटी ७३ लाख खर्चाच्या आराखडय़ास मंजुरी दिली. याबरोबरच पाणीपुरवठा विभागाने हिंगोली व सेनगाव तालुक्यांतील ३३ गावांच्या सरपंच व ग्रामसेवकांना लेखी पत्र देऊन टँकरऐवजी इतर उपाययोजना सुचविण्याबाबत कळविले.
यंदा पाऊस कमी झाल्याने जिल्हय़ात तीव्र पाणीटंचाईचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाच्या १ हजार ३३१ गावांमध्ये मंजूर आराखडय़ात १ हजार ८५४ उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी १० कोटी ७३ लाख ३ हजार रुपये खर्चास मंजुरी मिळाली. गतवर्षी टँकरवर २१ लाख ७३ हजार रुपये खर्च झाला.
या वर्षी हिंगोली तालुक्यातील १५, तर सेनगाव तालुक्यातील १८ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असताना १२८पैकी ३३ गावांच्या सरपंच-ग्रामसेवकांना लेखी पत्राद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे.  टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे ही शेवटची उपाययोजना आहे. त्यापूर्वी इतर उपाययोजना घेता येतील काय? हे तपासणे आवश्यक आहे, तसे सुचविण्याचे कळविण्यात आले आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.