दिवा स्थानकात शुक्रवारी झालेल्या रेल रोको नंतर रेल्वे पोलिसांची विविध पथके रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या दंगलखोर प्रवाशांचा शोध घेऊ लागले आहेत. मात्र हे आंदोलन सुरू असताना २० हजारांहून अधिक प्रवाशांच्या जमावासमोर पोलिसांची संख्या मात्र तुटपुंजीच होती. प्रवाशांच्या तुलनेत पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे दिव्यातील दंगलखोरी वाढली असून वारंवार याची प्रचीती येऊ लागली आहे. दिवा गावच्या लोकसंख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून या भागात ठाणे शहर पोलिसांचे एकही पोलीस ठाणे नाही. त्यामुळे मुंब्रा पोलीस ठाण्याअंतर्गत हा भाग येत असून तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना या भागातील कायदा सुव्यवस्थेचा भार पेलावा लागत आहे. ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत दिवा स्थानक असल्यामुळे या स्थानकाला केवळ दोन कर्मचारी देण्यात आले आहेत.
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या तुटपुंजी असल्याचा प्रकार काही नवा नाही. अनेक भागांमध्ये लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत पोलीस ठाणे अपुरी पडत असून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. सगळीकडे अशीच परिस्थिती असली तरी दिव्यासारख्या प्रवाशी असंतोषाने धगधगणाऱ्या स्थानकाकडे गृह विभागाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्टपणे पुढे येऊ लागले आहे. दंगलखोर स्थानकामध्ये रेल्वे सुरक्षेसाठी प्रवाशांना पोलिसांची गरज वाटू लागली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेविषयी जागरूकता वाढून रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही, सामान स्कॅनिंग मशीन आणि मेटल डिटेक्टरसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महत्त्वाच्या मोठय़ा स्थानकावर सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. मात्र दिवासारख्या स्थानकांच्या सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यात आले. दिव्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वारंवार घडत असून दीड वर्षांपूर्वी या स्थानकात गोळीबाराचा प्रकार घडला होता. प्रवाशांचे पाकिटे, मोबाइल, बँग्स लुटण्याचे प्रकारही येथे वारंवार घडत असतात. काही दिवसांपूर्वी या भागातून जाणाऱ्या एका मालगाडीच्या चालकाला सुऱ्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला गेला. या वेळी त्या भागात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी हे रेल्वे पोलिसांचे काम आहे असे सांगत हात झटकले होते.