मुंबईच्या २०१४ ते २०३४ या विकास आराखडय़ात विविध गोष्टींचा समावेश करण्याची मागणी होत असताना, सर्व मुंबईकरांना इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सुविधाही उपलब्ध व्हावी याचीही मागणी जोर धरू लागली आहे. मुख्य म्हणजे ब्रॉडबॅण्डच्या पायाभूत सुविधेसाठी सरकारने वेगळे धोरण ठरवावे व पुढील २० वर्षांत विकास आराखडय़ात त्यानुसार अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ‘इंटरनेट फॉर ऑल’ (इन्फोऑल – सर्वासाठी इंटरनेट) हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
अभियानासाठी शहरातील अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिटय़ूट (यूडीआरआय), पार्टनर फॉर अर्बन नॉलेज, अ‍ॅक्शन अँड रिसर्च (पुकार) आणि मजलिस मंच या तीन प्रमुख संघटनांचा गट कार्यरत असून, आयआयटी-मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. अभय करंदीकर, हे या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार आहेत. जगातील अनेक मोठय़ा शहरांमध्ये महानगरपालिकेद्वारेच संपूर्ण शहरात ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार पालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळा, ग्रंथालये, अग्निशमन केंद्र, बगीचे, पिम्पग स्टेशन इत्यादी सर्व सेवा महानगरपालिकेच्या नेटवर्कशी जोडता येतात. याच धर्तीवर मुंबईतही अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही या अभियानाची मुख्य मागणी आहे.
मागील दोन दशकांमध्ये मोबाइलधारकांची संख्या ९० कोटीच्या घरात असताना ब्रॉडबँड सेवा वापरणाऱ्यांची संख्या आपल्या देशात नगण्य आहे. जेव्हा ब्रॉडबँड सेवेच्या वापरात दहा टक्के वाढ होते, तेव्हा विकसनशील देशांच्या जीडीपीमध्ये १.४ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यामुळे देशाच्या एकंदर आíथक उलाढालीत वाढ होण्याची शक्यता असते, असे अभियानाच्या संकेतस्थळावर (www.sabkeliyebroadband.com)   नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये महानगरपालिकेतर्फे मुंबईला वायफाय शहर बनवणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, त्यादिशेने अद्याप कोणतीच पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. ब्रॉडबॅण्ड सुविधेमुळे मुंबईकरांना सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था, शासनाशी संपर्क, आरोग्यसेवा, वाहतूक, रोजगाराच्या संधी आणि शिक्षणविषयक अनेक सार्वजनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. इंटरनेट ब्रॉडबॅण्ड हा मूलभूत अधिकार आहे आणि तो शहरातील प्रत्येक नागरिकाला मिळावा या मागणीसाठी अभियानाअंतर्गत याचिकाही दाखल करण्यात आली असून, त्यासाठी सह्य़ांची मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वासाठी ब्रॉडबॅण्ड हा संदेश रिक्षा, रेडिओ, सोशल मीडिया आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी एक डिजिटल व्हॅनही तयार करण्यात आली असून, गेले दोन आठवडे शहरातील विविध भागात ही व्हॅन जनजागृतीचे काम करत आहे. हिंदी व मराठी भाषेतील रॅप गाण्याद्वारे लोकांशी थेट संवाद साधणे, ब्रॉडबॅण्ड सुविधेचे महत्त्व सांगणारे व्हिडीओ दाखवणे आणि अधिकाधिक लोकांकडून याचिकेवर सह्य़ा घेऊन त्यांना अभियानात सहभागी करून घेतले जात आहे.