यूटय़ूब अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ मनोरंजनाचे किंवा नको ते व्हिडीओ पाहिले जातात, असा अनेकांचा समज असतो. याच समजातून अनेक पालक आपल्या पाल्याला या अ‍ॅपपासून दूर ठेवतात. तर अनेक पालकांना आपला पाल्य कोणते व्हिडीओ पाहतो याची माहिती मिळावी अशी अपेक्षा असते. हीच गरज गुगलने लक्षात घेतली आणि लहान मुलांसाठी खास यूटय़ूब किड्स हे वेगळे अ‍ॅप तयार केले.
यूटय़ूबचे लहान मुलांसाठीचे हे अ‍ॅप गुगल प्ले आणि आयटय़ून्स या दोन्ही ओएसच्या मोबाइलवर उपलब्ध आहेत. पाच वष्रे किंवा त्यावरील मुलांसाठी हे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून लहान मुलांना पाहता येतील असे शैक्षणिक, बालगीतांचे, बडबड गीतांचे, कथा, कार्टून्सचे व्हिडीओज् देण्यात आले आहे. याचबरोबर या अ‍ॅपमध्ये व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या जाहिरातींवरही मर्यादा आणली आहे. यामुळे हे अ‍ॅप लहान मुलांसाठी खूप उपयुक्तआणि सुरक्षित बनल्याचे गुगलचे अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष पवनी दिवानजी आणि यूटय़ूब किड्स उत्पादनाचे व्यवस्थापक शिम्रित बेन-याइर यांनी त्यांच्या ब्लॉगवर नमूद केले आहे. या अ‍ॅपमध्ये व्हिडीओज्ची लांबीही कमी करण्यात आली आहे. जेणेकरून मुले फारशी कंटाळणार नाहीत. याचबरोबर या अ‍ॅपवर पालकांचे नियंत्रणही असणार आहे. यामध्ये पालक वेळेचे बंधन ठरवून देऊ शकतात. तसेच आवाजाचे नियंत्रण आणि व्हिडीओज् शोधावरही र्निबध आणता येऊ शकतात. तसेच या अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमची प्ले लिस्टही तयार करून ती शोज, म्युझिक, लर्निग आणि एक्स्प्लोर या चार भागांमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. लहान मुलांच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेल्या या अ‍ॅपमधील आयकॉन मोठे देण्यात आले आहे. सध्या हे अ‍ॅप अमेरिकेत उपलब्ध असून लवकरच ते इतरत्र उपलब्ध होणार आहे.