जेएनपीटी बंदराचा विकास करण्यासाठी जेएनपीटी प्रशासन तसेच केंद्रीय शिपिंग मंत्रालयाच्या धोरणानुसार बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर बंदरात ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून या प्रकल्पांना मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. यामध्ये बंदरावर आधारित सेझ, चौथ्या बंदराची उभारणी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब तसेच, राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही महामार्गाचे आठ पदरीकरण करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे बंदरात जादा क्षमतेची जहाजे यावीत याकरिता जेएनपीटी बंदराच्या चॅनलचे रुंदीकरण करण्यासाठी एकूण चार प्रस्तावित प्रकल्पांसाठी ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यापैकी रस्ते विकास व बंदराच्या चॅनलच्या रुंदीकरणाचे काम जेएनपीटी स्वत: करणार आहे. सेझ,चौथ्या बंदराची निर्मिती बीओटीवर करण्यात येणार आहे.
नैसर्गिक खोली लाभलेल्या जेएनपीटी बंदराचा विकास झपाटय़ाने होत आहे. बंदरात सध्या बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारण्यात आलेले जीटीआय व दुबई पोर्ट वर्ल्ड हे दोन खासगी बंदर कार्यान्वित आहेत. तर याच ठिकाणी ३३० मीटरच्या नवीन बंदराची उभारणी सुरू आहे. जेएनपीटीसह तिन्ही बंदरांतून मिळून ४५ लाखांच्या आसपास दर वर्षी कंटेनर्सची हाताळणी केली जात आहे. तसेच बंदरातून द्रव पदार्थाचीही आयात केली जात आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून जेएनपीटी बंदरात सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तिन्ही बंदरांच्या तुलनेने दुप्पट लांबीची म्हणजे २००० मीटरची जेटी असलेले चौथे बंदर उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बंदराच्या बीओटीचे काम सिंगापूर सरकारच्या पोर्ट ऑफ सिंगापूर या बंदराला देण्यात आलेले आहे. बंदराच्या उभारणीसाठी नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीची क्षमता वाढून दुपटीने म्हणजे एक कोटीवर जाणार आहे. तर बंदरात सध्याच्या चॅनलच्या खोलीमुळे केवळ चार हजार कंटेनर क्षमता असलेले जहाज येत असल्याने किमान सहा ते आठ हजार क्षमतेची जहाजे बंदरात यावीत याकरिता बंदराच्या चॅनलचे रुंदीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक स्वत: जेएनपीटी करणार असल्याची माहिती जेएनपीटीचे सचिव व मुख्य व्यवस्थापक शिबैन कौल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली आहे. प्रस्तावित प्रकल्पांना विलंब होत असल्याने त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेत वाढ होत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. तसेच बंदरावर आधारित वाहतुकीसाठी रस्त्याचे जाळे निर्माण करून सध्याचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब तसेच राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही रस्त्यांचे आठपदरीकरण करण्यात येणार असून त्याकरिता आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याच बरोबर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शिपिंग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील पहिल्या बंदरावर आधारित सेझच्या उभारणीसाठी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पांच्या उभारणीमुळे जेएनपीटी बंदर परिसरात लाखो रोजगारांची निर्मितीही होणार आहे.