रेल्वेच्या ऑनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात गेल्या काही दिवसांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामुळे याआधी प्रतिमिनिट २००० तिकिटांचे आरक्षण होणाऱ्या या संकेतस्थळावरून आता ७२०० तिकिटे एका मिनिटात आरक्षित करणे शक्य झाले आहे. तसेच याआधी संकेतस्थळ उघडताना येणाऱ्या अनेक अडचणीही आता दूर होणार आहेत, असे आयआरसीटीसीतील सूत्रांनी सांगितले.
‘आयआरसीटीसी’चे हे संकेतस्थळ सकाळी आठ ते दहा या गर्दीच्या वेळेत नेहमीच ‘हँग’ असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली होती. मात्र आता ‘नेक्स्ट जनरेशन तिकीट प्रणाली’ म्हणून पुढे येणाऱ्या या संकेतस्थळात अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच हे संकेतस्थळ अधिक अद्ययावत करण्यात आले आहेत. तिकीट आरक्षणांसाठी गर्दीच्या वेळेत या संकेतस्थळांवरील जाहिराती नाहीश्या केल्या जात असल्याने हे संकेतस्थळ चटकन उघडते.
परिणामी, या संकेतस्थळावरून आता कमीत कमी वेळा अधिक तिकिटांची विक्री होते. याआधी या संकेतस्थळावरून दर मिनिटाला दोन हजारांपर्यंत तिकिटे आरक्षित होत होती. मात्र आता याच कालावधीत ७२०० तिकिटे आरक्षित होणे शक्य आहे. कोकणात जाणाऱ्या गाडय़ा एक ते दोन मिनिटांत हाऊसफुल्ल होण्यामागेही हेच कारण होते, असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
हे संकेतस्थळ अद्ययावत झाल्यापासून १० ते ११ या एका तासात दीड लाख तिकिटे विकली गेल्याचे लक्षात आले आहे. याआधी या कालावधीत केवळ ६० हजार तिकिटांचे आरक्षण झाले होते. मात्र जुलै महिन्यात तब्बल पाच दिवस या एका तासात आरक्षणाने दीड लाखांचा आकडा ओलांडला होता. उत्सवांसाठीच्या विशेष गाडय़ांच्या आरक्षणांदरम्यान याआधी हे संकेतस्थळ अपलोड होण्यास वेळ लागायचा. मात्र आता ही सुविधा सहज उपलब्ध होणार असल्याचे आयआरसीटीसीतील सूत्रांनी सांगितले.