मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या उच्च लहरीमुळे (किरणोत्सारामुळे) कर्करोग होत असल्याचा दावा एक गट तर दुसरा गट कर्करोग होत नसल्याचा दावा करत आहे. परंतु यासंदर्भात अजूनपर्यंत खास संशोधन झाले नसल्याने डॉक्टर व सामान्यांमध्येच संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
सध्या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या उच्च लहरीमुळे क्षणभरात लाखो किलोमीटर अंतरावरील व्यक्तीशी संवाद साधणे अत्यंत सहज आणि सोपे झाले आहे. त्यासाठी भ्रमणध्वनीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गुराख्याच्या हातात तर शहरात रिक्षाचालकाच्या हातात भ्रमणध्वनी दिसून येत आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत भ्रमणध्वनी पोहोचला पाहिजे यासाठी ठिकठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. आता तर उच्च क्षमतेचे टॉवर लावले जात आहे. या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या उच्च लहरीमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो. सोबतच इतर पशु, पक्षांवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या उच्च लहरी या ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या प्रकारातील असतात. या लहरींचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, कामात मन न लागणे, ऐकण्यास कमी येणे, झोप न येणे, थकवा येणे, चिडचिड होणे, प्रजनन क्षमतेत घट, कर्करोग, मेंदूत गाठ होणे आदी विकारही होत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच लहान मुलांना व्यंगत्व, आंधळेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.
टॉवर २०० फूट उंच असले तरी त्यातून निघणाऱ्या उच्च किरणोत्सारी लहरी २०० फूट समांतर जमिनीस सिमेंट काँक्रिटच्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात. त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. मोबाईल टॉवर असलेल्या तीनशे मीटर परिसरातील नागरिकांमध्ये त्याचा परिणाम जाणवतो. तीनशे मीटर परिसरात या लहरी पसरतात. या मोबाईल टॉवरच्या जवळपास राहणाऱ्या लोकांमध्ये मात्र विविध आजार होतात. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजार होतात, असे म्हणणाऱ्यांमध्ये काही डॉक्टर्स, पर्यावरणवादी, संशोधन संस्थांचा समावेश आहे. तर विरोधकांमध्ये काही डॉक्टर्स, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या उच्च लहरीचा परिणाम मानवी जीवनावर होत असेल, परंतु तसे पुराव्यानिशी सिद्ध झाले नसल्याचे म्हटले आहे. या दोन गटातील दावे प्रतिदाव्यामुळे सामान्य नागरिक व डॉक्टरांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. कारण या उच्च लहरींचा परिणाम मानवी जीवनावर होत असला तरी त्याचे संशोधन झाले नाही. अनेक संशोधक व संघटना मात्र आता या विषयावर संशोधन करत आहेत.

संशोधन सुरू आहे- डॉ. मानधनिया
मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या उच्च लहरींचा मानवी जीवनावर परिमाण होतो काय, याचे संशोधन सुरू आहे. माझ्याकडे कर्करोगाचे जे रुग्ण तपासणीसाठी व उपचारासाठी येत आहेत, त्यामध्ये बहुतांश रुग्ण मोबाईल टॉवरपासून तीनशे मीटरच्या आत असणारे दिसून आले आहेत. १० रुग्णांपैकी ६ रुग्ण हे मोबाईल टॉवरच्या आसपास राहणारे आहेत. त्यामुळे या रुग्णांवर या उच्च लहरींचाच परिणाम झाला असावा, असे माझे वैयक्तिक मत आहे. संशोधनांती ते पुढे स्पष्ट होईलच, असे मत कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. शक्यतो मोबाईल छातीला लागून असलेल्या शर्टच्या खिशात ठेवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.