शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील सकस आहाराची गरज असलेल्या तब्बल ८५० रुग्णांना आता ‘इस्कॉन’तर्फे भोजनाचा पुरवठा करण्यात येणार आहे. इस्कॉनकडून रुग्णांना सकस आहार मिळण्याबरोबरच पालिकेच्या सुमारे सव्वाकोटी रुपयांची बचत होणार आहे. परंतु हातचे काम जाणार या भीतीने रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
क्षयरोग रुग्णालयामध्ये दररोज सरासरी १५० ते २०० रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचारासाठी येतात आणि त्यापैकी सरासरी ४० ते ५० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. या रुग्णांना सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री नाश्ता व आहार दिला जातो. सामान्य क्षयरुग्ण, मधुमेह असलेले क्षयरोगी व एमडीआर रुग्णांना गुणवत्तापूर्ण व प्रमाणपद्ध आहार उपलब्ध करावा लागतो. औषधोपचारामुळे क्षयरुग्णावर दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी दर्जेदार, उत्कृष्ट व पौष्टिक आहाराची गरज असते. त्यामुळे त्यांना भोजनातून ७० ग्रॅम प्रथिने व १,८९० उष्मांक (कॅलेरी) या प्रमाणात आहार दिला जातो. सध्या या रुग्णांना सकस आहार देण्याची जबाबदारी रुग्णालयातील स्वयंपागृहातील स्वयंपाक्यांवर आहे. या स्वयंपाकगृहात रुग्णांसाठी शिजविल्या जाणाऱ्या आहारासाठी वर्षांकाठी सुमारे ४, ८५,०९,२०० रुपये इतका खर्च पालिकेला येतो.
क्षयरोग रुग्णालयातील ८५० रुग्णांना भोजन पुरविण्याची तयारी इस्कॉनने पालिकेला पत्र पाठवून दर्शविली होती. त्यास सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही मान्यता मिळाली. त्यामुळे क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना भोजन पुरविण्याचे काम इस्कॉनला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. इस्कॉन फूड रिलीफ फाऊंडेशनमार्फत प्रतीरुग्ण ११० रुपये दरामध्ये भोजन पुरविण्यात येणार असून पालिकेला वर्षांकाठी सुमारे ३,४१,२७, ५०० रुपये इतका खर्च येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या १,४३,८१,७०० रुपयांची बचत होणार आहे. रुग्णांना तीन र्वष भोजन पुरविण्याची जबाबदारी इस्कॉनवर सोपविण्यात येणार आहे. मात्र पहिल्या वर्षी भोजन समाधानकारक वाटल्यास पुढील दोन वर्षे इस्कॉनकडेच ही जबाबदारी राहणार आहे. तसेच दर तीन वर्षांनी भोजन पुरवठय़ाबाबत इस्कॉनला नूतनीकरण करावे लागणार आहे. क्षयरोग रुग्णालयातील स्वयंपाकगृहामध्ये एक मुख्य स्वयंपाकी आणि तब्बल ६३ स्वयंपाकी क्षयरुग्णांच्या आहाराची व्यवस्था पाहात आहेत. आता रुग्णांना भोजन पुरविण्याचे काम इस्कॉनला मिळाल्यामुळे हे कर्मचारी धास्तावले आहेत. आपल्या नोकरीवर गदा येणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटत आहे.