नवी मुंबईतील शाळा, कॉलेज, रुग्णालयांमध्ये प्रकल्पग्रस्तांना असणारा कोटा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना वठणीवर आणल्यानंतर सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील आयटी पार्कमध्ये आयटी कंपनीच्या नावाखाली घेतलेले भूखंडांचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सिडकोच्या विधी विभागाने नवी मुंबई पालिका, उद्योग आणि मुद्रांक शुल्क विभागांना या भूखंडाची जंत्री पाठविण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे या भूखंडाचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांचे तसेच बिल्डरांचे धाबे दणाणलेले आहेत.
माहिती तंत्रज्ञान उद्योगाला प्रोत्साहान देता यावे यासाठी राज्य सरकारने सात वर्षांपूर्वी आयटी कंपन्यांना अनेक सवलती तसेच वाढीव चटई निर्देशांक (एफएसआय) दिला आहे. त्यामुळे सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील सेक्टर ३० मध्ये आयटी पार्क आरक्षित केला आहे. शहरात आयटीमुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा हा यामागचा उद्देश होता. त्यासाठी त्यांना तीन वाढीव एफएसआय देण्यात आला आहे. मात्र भूखंड मिळेपर्यत आयटीचा बोलबाला करणाऱ्या यातील काही कंपन्यांनी नंतर आयटीच्या नावाखाली वेगळेच उपद्व्याप सुरू केल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. त्यात आयटीची व्याख्या ठरविताना अडचण येत असून एक-दोन संगणक ठेवणारी दुकानेही आयटी कंपन्या असल्याचे भासवीत आहेत. वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी पाच वर्षांपूर्वी येथील कंपन्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर पालिकेने या दुकानांवर थातूरमातूर कारवाई केली, पण त्यानंतरही येथील स्थिती पूर्वीसारखी आहे.
आयटी कंपन्यांच्या एकूण क्षेत्रफळापैकी ६० टक्के क्षेत्रफळ हे आयटीसाठीच राखीव असावे अशी हे भूखंड देताना अट घालण्यात आली आहे. त्या सिडकोने या आयटी कंपन्यांवर कारवाई करण्यापूर्वी पूर्ण तयारी करण्याचे ठरविले असून त्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या नगररचना विभागात या कंपन्यांनी कोणत्या नावाने बांधकाम प्रमाणपत्र घेतल्याची चौकशी केली जात आहे. काही कंपन्यांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जागेचा वापर बदललेला आहे. त्याचप्रमाणे उद्योग विभागाकडे या कंपन्यांनी कोणत्या उद्योगाचा आणि किती युनिटचा प्रकल्प अहवाल सादर केला आहे हे पाहिले जाणार आहे. आयटी कंपन्यांचे भूखंडांना मुद्रांक शुल्क सवलत असल्याने या कंपन्यांनी नोंदणी करताना कोणत्या नावाने दस्तावेज केला आहे.
सध्या त्या ठिकाणी आता कोणत्या कंपन्या व्यवसाय करीत आहेत हे पाहिले जात आहे. त्यासाठी बीएसईएल, मायक्रो, विश्वरूप, हावरे, रियल ट्रेड, रूपा इन्फोटेक, यश अकाऊंन्टिंग आणि श्री जावा वेब या आयटी कंपन्या सिडकोच्या रडारवर आहेत. त्यांची कुंडली तीन प्राधिकरणांकडून मागविण्यात आली आहे. सिडकोकडून एका नावाने भूखंड घेऊन दुसऱ्याच कंपन्यांना हे भूखंड हस्तांतरित करण्यात आले असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिक व्ही. राधा यांनी सांगितले.