संध्याकाळचे साडेचार वाजले होते.सायन प्रतीक्षा नगर येथील बस आगारातील सावलीत काही महिला आणि मुले काँग्रेसचे झेंडे घेऊन उभे होते. काही वेळानंतर काँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड यांची प्रचार फेरी निघणार होती. काही वेळेपूर्वी जेथे शांतता होती, तो भाग गर्दीने फुलू लागला. काँग्रेसच्या टोप्या, झेंडय़ांचे वाटप सुरू झाले. एक चित्ररथ आला. त्यावरून एकनाथ गायकवाड प्रचार करणार होते. मग स्थानिक नेते आणि कार्यकर्ते महागडय़ा गाडय़ांमधून येऊ लागले. एव्हाना सहा वाजत आले होते. प्रतीक्षानगर बस डेपोचा परिसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेला. चित्ररथातील निवेदकाने माईकचा ताबा घेतला आणि आपल्या खास प्रचारकी शैलीत प्रचार सुरू केला. एका साध्या गाडीतून उमेदवार एकनाथ गायकवाड आले. फटाक्यांची आतषबाजी झाली. गायकवाड तडक रथावर चढले आणि प्रचार फेरी सुरू झाली. त्यांच्यासमेवत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आल्वीन दास होते. मुंबई म्हाडाचे अध्यक्ष प्रसाद लाडही रुजू झाले.
एकनाथ गायकवाड या भागातील विद्यमान खासदार आहेत. त्यांनी रथावर उभे राहून लोकांना हात हलवून अभिवादन करण्यास सुरवात केली. प्रतीक्षानगरचा मध्यमवर्गीय मराठमोळया वस्तीच्या या भागातील रस्ते दुतर्फा गर्दीने फुलून गेले. वाजत गाजत, ही प्रचार फेरी निघाली. एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि महिला बालविकास मंत्री वर्षां गायकवाड याही त्यात सामील झाल्या. प्रचार फेरी मार्केटमधून पुढे जाऊ लागली. प्रचार फेरीतील महिला पत्रके वाटत होत्या. मुले त्यांच्याभोवती गलका करून ती पत्रके घेत होती. एक तरुणी आयपॅडने चित्रिकरण करत होती. प्रतीक्षानगरचे रस्ते मुळात निमुळते. त्यात ही प्रचार फेरी आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
प्रचार फेरी हेमंत मांजरेकर मार्गावरून निघाली. हा भाग दाक्षिणात्य वसाहतींचा. मग निवेदकाने दाक्षिणात्य भाषेत आवाहन करायला सुरवात केली. एव्हाना रॅली अ‍ॅण्टॉप हिलच्या गल्लीत शिरली होती. कुणीतरी वडापाव आणले. तरुण कार्यकर्त्यांची ते घेण्यासाठी झुंबड उडाली. अ‍ॅण्टॉप हिल हा मुस्लिमबहुल झोपडपट्टीचा भाग. तेथील कोकरी आगार भागातून प्रचार फेरी निघाली. एका मशिदीतून अजान सुरू होती. ती संपेपर्यंत प्रचार फेरी थांबली. पुढे मुस्लीम कार्यकर्ते सहभागी झाले. सुरवातीला उत्साहाने रॅलीच्या पुढे चालणाऱ्या महिला गाडीत शिरल्या आणि दाटीवाटीने बसल्या. हात हलवून अभिवादन करणारे गायकवाड आता मात्र केवळ स्मितहास्यच करत होते. ही बकाल वस्ती होती. निवेदक म्हणत होता, ‘आपका विकास सोनिया गांधी ने किया, राहुल गांधी ने किया.. एकनाथ गायकवाडने किया.’सीजीएस कॉलनीतील कमला नगरातील जाहीर सभेत एकनाथ गायकवाड भाषण करणार होते. व्यासपीठावरील एक नेता म्हणाला, मिनी उत्तर प्रदेश मे आपका स्वागत है.. हा विभाग उत्तर भारतीयांचा वस्तीचा होता. गायकवाड यांनीही हिंदूीत भाषण ठोकले आणि टाळ्या मिळवल्या. इतक्यात फटाके फुटले. दोन चार गाडय़ा, दहा पंधरा कार्यकर्ते घोषणा देत पुढे आले. एकनाथ गायकवाड व्यासपीठावर होते. मग कोण आलं असा लोकांना प्रश्न पडला. तर ते होते आमदार जगन्नाथ शेट्टी. मै अभी जा रहा हू धारावी मे एक सभा के लिए, असे बोलत गायकवाड खाली उतरले आणि धारावीकडे रवाना झाले. प्रतीक्षानगरच्या मराठमोळ्या वस्तीतून निघून एकनाथ गायकवाड यांची प्रचार फेरी मिनी उत्तर प्रदेशात समाप्त झाली.