इराक सीरियामधील ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेला जाऊन मिळालेल्या कल्याणच्या चार युवकांना एका अफगाणी नागरिकानेच चिथावणी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अफगाण नागरिक अनेक महिने कल्याणमध्ये वास्तव्यास होता. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या अफगाणीची ओळख पटवली आहे. या अफगाणी नागरिकाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून जिहादचे धडे देण्याचा प्रयत्न केला होता, असे तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
कल्याणमधील चार युवक इराकमध्ये दहशतवादी गटाला जाऊन मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या घटनेमुळे खळबळ माजलेली असतानाच यापैकी एकाचा एका चकमकीत मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे हे युवक जिहादच्या आशेनेच थेट दहशतवादी गटाला जाऊन मिळाल्याचे स्पष्ट झाले होते.
ही बाब चिंताजनक असल्यामुळे याबाबतचा समांतर तपास एटीएसने सुरू केला होता. या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जिहादबद्दल कडवी व चिथावणीखोर भाषणे संबंधित अफगाण नागरिकाने दिल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले. असे धडे देणारा एकच अफगाण नागरिक होता की आणखी काहीजण अशा मोहिमेवर आले होते का, याचीही चौकशी करण्यात आली. मात्र आतापर्यंत फक्त एकच अफगाण नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे युवक इराकमध्ये कसे गेले वा त्यांना कोणी चिथावणी दिली, याचा तपास करताना एटीएसला स्थानिक पातळीवर जिहादबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती मिळाली. त्यावरून एटीएसने काहीजणांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. या संपूर्ण तपासात संबंधित अफगाण नागरिकाचेच नाव पुढे आले. हा नागरिक बराच काळ कल्याणमध्ये वास्तव्याला होता, असेही चौकशीत स्पष्ट झाले.
गेल्या काही महिन्यांपासून हा अफगाण नागरिक कल्याणमध्ये वावरत होता. ठरावीक वयोगटातील युवकांना गटागटाने एकत्र करून तो जिहादबद्दल चिथावणीखोर भाषणे करीत असे. त्यामुळे आता साध्या वेशातील एटीएस अधिकाऱ्यांनी फक्त कल्याणच नव्हे तर मुंब्रा, पुणे, ठाणे, रायगड आदी ठिकाणीही अशा पद्धतीचे चिथावणीखोर प्रशिक्षण सुरू आहे का, याच्यावर पाळत ठेवल्याचेही एटीएसमधील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी ठाणे ‘एटीएस’ने कारवाई करून काहीजणांना अटक केली असली तरी प्रत्यक्षात जो अफगाण नागरिक कल्याणमध्ये आला होता, त्याच्याबाबत अधिकाधिक माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे, असे एटीएसचे प्रमुख व अतिरिक्त महासंचालक हिमांशू रॉय यांनी स्पष्ट केले.